Baramati Lok Sabha Election 2024: पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. अशातच सर्वच पक्षांनी लोकसभेचं (Lok Sabha) मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Elections) यंदाची लोकसभा अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील निवडणुका दिग्गजांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. त्यातली एक जागा म्हणजे, बारामतीची (Baramati Lok Sabha Constituency). गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजाकारणात बारामती चर्चेत आहे. अशातच आता याच बारामतीबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं मोठं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. 


भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे, त्यासाठी घोषणा करण्याचीही गरज नाही, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवारच लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा जंगी सामना रंगणार आहे. असं असलं तरी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं असं वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटलांना त्यांच्या उमेदवारीबाबत विचारलं असता, माझ्या उमेदवारीबद्दल पक्ष निर्णय घेईल, असंही ते म्हणाले आहेत. 


सध्या राज्याच्या राजकारणात बारामतीचीच चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट यामुळे आधीच बारामती चर्चेत होती. बारामती म्हणजे, पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला. पण पक्षातील फुटीमुळे आता याच बारामतीत कुटुंबच एकमेकांविरोधात उभं ठाकल्याचं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या पत्नी आणि पवार कुटुंबाची सून सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणार उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी आगामी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार एवढं नक्की. पण अशातच आणखी एक ट्वीस्ट बारामतीत आला आहे, त्यानं केवळ बारामतीकरच नाहीतर राज्यातील सारेच हैराण झाले आहेत. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच, अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बारामीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वातं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली, आता माघार नाही, बारामतीतून मी लढणारच, विजय शिवतारेंनी रणशिंग फुंकलं