छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहातअडकवले असून त्यांचा अभिमन्यू झालाय, असा गंभीर आरोप माजी मंत्री शिंदे गटाचे सुरेश नवले (Suresh Navale) यांनी भाजपावर केला आहे. भाजपाच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत. असं म्हणत सुरेश नवले यांनी मुख्यमंत्र्यांनाच घरचा आहेर दिलाय. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सुरेश नवले यांनी वक्तव्य केले आहे.
सुरेश नवले म्हणाले, भाजपाने कृपाल तुमाने ,हेमंत पाटील ,भावना गवळी यांचा बळी दिला आहे. भाजपाच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत.. हे महाराष्ट्रातल्या शिवसेनेसाठी शोभादायक नाही. शिवसैनिकाला न्याय मिळत नाही म्हणून हा उठाव झाला. सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत बाहेर पडले आणि सरकार अस्तित्वात आलं. ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सोडलं, ठाकरेंचं नेतृत्व झुगारलं . त्याच कारणासाठी शिवसैनिकांचा आता राग आहे . सामान्य शिवसैनिक सोडा विद्यमान खासदारांना आपली खासदारकी मिळवता आली नाही हे दुर्दैव आहे .मित्र पक्षाचे उमेदवार सांभाळण्यासाठी पोसण्यासाठी शिवसेनेवर जबाबदारी असं चित्र दिसतंय.
सर्वस्व पणाला लावून जे मुख्यमंत्र्यांसोबत आले त्यांच्या वाट्याला राजकीय जोहार
महायुतीच्या जागावाटपवार बोलताना सुरेश नवले म्हणाले, परभणीची जागा रासपाला दिली. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. मला खात्री आहे ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली आहे. रत्नागिरीची जागा भाजपाला सोडली आहे. भारतीय जनता पक्ष ड्रामा करते लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी. या राज्यामध्ये शिवसेनेचा बळी देणं आणि शिवसेना संपवण्याचा कारस्थान भारतीय जनता पार्टी करते. भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्ष संपवते आहे. आयबीचा रिपोर्ट सर्व्हे निगेटिव्ह आहे म्हणत उमेदवारी नाकारत आहेत. सर्वस्व पणाला लावून जे मुख्यमंत्र्यांसोबत आले त्यांच्या वाट्याला राजकीय जोहार आलाय. जागा बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यावर दबाव कुणी टाकला. भारतीय जनता पार्टीच्या दबावाला मुख्यमंत्री बळी पडले. मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या दबावाला एकाकी तोंड देत आहेत ते कमी पडत आहेत.सामूहिक दबाव आणून जागा सोडून घेतल्या जात आहेत, असे देखील सुरेश नवले म्हणाले.
48 जागांमध्ये ही स्थिती भाजप करते तर 288 जागेमध्ये काय करेल?
तिकिट नाकारण्यावर सुरेश नवले म्हणाले, विधानसभेची निवडणूक लागली तर भारतीय जनता पार्टी सांगेल संजय शिरसाटांच्या विरोधात आयबीचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे.अब्दुल सत्तार यांची सीबीआय चौकशी सुरू आहे त्यांना तिकीट दिलं जाणार नाही. 40 पैकी 30 आमदारांना नाकारलं तर काय स्थिती होईल हे पाहून अंगावर काटा येतो. 48 जागांमध्ये अशी स्थिती भाजप करते तर 288 जागेमध्ये काय करेल? जे कारण देत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना नाकारलं. तेच कारण देऊन आम्हला नाकारलं जातंय आमच्या शिवसैनिकांनी कोणाकडे पाहायचं. महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व मुख्यमंत्र्यांची अशी अवस्था करते आहे. त्याला आमचं नेतृत्व बळी पडतंय हे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
मुख्यमंत्र्यांचा अभिमन्यू होण्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व कारणीभूत
सुरेश नवले म्हणाले, तहाच्या बोलणीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून फसवणूक होतेय. पूर्वी महाभारतात चक्रव्हूमध्ये अभिमन्यू अडकतो तशी स्थिती मुख्यमंत्र्यांची झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष तळागाळात गेलेला असेल गाळात गेला आणि तळात गेला तर त्या काळात बाहेर काढणं फार कठीण असेल. मुख्यमंत्र्यांचा अभिमन्यू होण्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व कारणीभूत आहे. ते चतुर आणि चाणाक्ष आहेत. ज्या गोष्टी आपल्याकडून करता येत नाहीत ते केंद्राकडून करून घेतल्या जात आहेत.
शिवसेनेला भारतीय जनता पार्टी फसवत आहे
सुरेश नवले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. सुरेश नवले म्हणाले, शिवसेनेला भारतीय जनता पार्टी फसवत आहे. त्यांचं सामुहिक नेतृत्व फसवत आहे. आता ही स्थिती तर विधानसभेत काय असेल यावरून शिवसैनिक चिंतेत आहे. त्यांची प्रतिक्रिया मी मांडतोय. भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्र्यावर माझ्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडेल. भारतीय जनता पार्टी युती धर्म पाळत नाही. त्यांनी युतीधर्म पाळला असता तर 13 जागा आम्हाला दिल्या असत्या. समोरच्या उमेदवाराचा अर्धा प्रचार झाला तरी ,आम्ही संभाजीनगरची जागा घोषित करून शकत नाहीत ही काय अगतिकता आहे. भारतीय जनता पार्टीच्या दबावापोटी ही जागा घोषित होत नाही.
भाजपचे धोरण पहिले मित्र संपवू नंतर शत्रूकडे पाहू
शिवसेना पक्ष चालवण्याचे दिग्दर्शन भाजपा करते आहे. हा सिनेमा लोकसभेत चालेल का याचे उत्तर जनता देईल. चाळीस आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ते विचार करतात ते 13 खासदारांना तिकिटासाठी हा घाम फुटला,तर उद्या आमचं तिकीट मिळवण्यासाठी किती घाम फुटेल...किती पराकाष्टा करावी लागेल...त्यात तिकिट मिळेल याची शंका आहे आमदारांच्या मनात साशंकता. भारतीय जनता पार्टीचे हे धोरण पहिले मित्र संपवू नंतर शत्रूकडे पाहू, असेही सुरेश नवले म्हणाले.