सांगली: विजापूर-गुहागर महामार्गावर  कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी गावानजीक क्रूझर जीप  आणि खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. या अपघातात क्रूझर मधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची भीषणता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास  विजापूर - गुहागर महामार्गावर हा अपघात झाला आहे. (Sangli Road Accident)


घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, जमखंडी (ता. बागलकोट, कर्नाटक) येथून क्रुझरमधून लग्नासाठीचे वऱ्हाड सावर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे येत होते. दोन क्रुझर तसेच नवरी मुलीसाठी स्वीफ्ट मोटार होती. ही वाहने बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजापूर-गुहागर महामार्गावरील जांभुळवाडी येथे आली. यावेळी 14 ते 15 जण जण बसलेल्या क्रुझरने पाठीमागून  ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. या धडकेत पाच जण जागीच ठार झाले. 


 अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कवठेमहांकाळ आणि जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.   तिघांची जखमींची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलला हलवले.


अपघातानंतर घटनास्थळीचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. याठिकाणी इतर वऱ्हाडींनी आक्रोश सुरु केला. रात्रीची वेळ असल्याने मृतदेह काढण्यात अडचणी येत होत्या. अपघातानंतर क्रुझरने पेट घेतला.  अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर अग्निशमन दलाने आग विझविली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. 


लग्नाचं रुखवत रस्त्यावर विखुरलं


ही दुर्घटना इतकी भीषण होती की, क्रुझर जीप ट्रॅव्हल्सला जोरात धडकली आणि त्यामध्ये क्रुझरच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातावेळी क्रुझर खच्चून भरली होती. क्रुझरच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाल्याने या भागात बसलेल्या लोकांचे काय झाले असेल, याची कल्पना येऊ शकते. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी चार ते पाच वऱ्हाडी गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जमखंडीवरुन सावर्डेला निघालेल्या वऱ्हाडींनी आपल्यासोबत लग्नासाठी आणलेले साहित्य, रुखवत अपघातानंतर रस्त्यावर पडले होते. घटनास्थळी हे विदारक दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज गलबलून आले. या प्रसंगामुळे घटनास्थळी अक्षरश: स्मशानशांतता पसरली होती.


आणखी वाचा


सांगलीत लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली क्रुझर लक्झरी बसला धडकली, भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी


पुण्यातून निघालेल्या टँकरला धडकली कार, भीषण अपघातात 10 ठार