Sanjay Raut : आम्ही न्याय विकत घेणारी माणसं नाही, जे न्याय विकत घेऊ शकतात ते सत्तेवर असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. आज मला न्यायाची अपेक्षा आहे. आमचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास असल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी आज मुंबईत (Mumbai) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.


16 आमदार अपात्र ठरले तर  उरलेले 24 देखील अपात्र ठरतील 


आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की जर 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतील. तसेच उरलेले 24 देखील अपात्र ठरतील असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळं हे सरकार क्षणभरही राहणार नाही. हे सरकार लवकर जाईल अशी ग्वाही आम्ही महाराष्ट्राला देऊ इच्छितो असेही राऊत म्हणालो. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आशावादी असल्याचं राऊतांनी सांगितलं.


 नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार 


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. हे दोन्ही नेते आज  उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. याबाबत देखील संजय राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, सध्या देशात चालू असणाऱ्या घडामोडींवर ते चर्चा करणार आहेत. देशात आघाडी संदर्भात ज्या चर्चा सुरु त्यावर देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे राऊत म्हणाले.


काही तासातच लागणार निकाल 


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी काल (10 मे) एका प्रकरणाची सुनावणी करत असतानाच 11 मे रोजी दोन महत्वाच्या प्रकरणांवर घटनापीठ निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यामुळं सर्वच जणांचे लक्ष आजच्या या निकालाकडे लागलं आहे. देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात किचकट प्रकरण असलेल्या निकालाचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या पद्धतीने विश्लेषण करणार? याकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. 


शिवसेना ठाकरे गटाकडून 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी


या सर्व प्रकरणातील सर्वात मोठा अन् कळीचा मुद्दा असणार आहे तो शिवसेना ठाकरे गटाकडून ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली आहे? त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ काही निर्णय घेणार की हे प्रकरण विधानसभेत विधानसभा अध्यक्षांकडे (तत्कालिन की विद्यमान हा सुद्धा पेच आहे) पाठवलं जाणार याकडेही लक्ष आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात विधानपरिषद निवडणूक पार पडल्यानंतर सत्तासंघर्ष नाट्याला सुरुवात झाली होती. या नाट्यामध्ये पहिल्या पाच दिवसांमध्येच अपात्रतेची नोटीस ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना बजावण्यात आली होती आणि त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. यामध्ये दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्यासह अपात्रतेची नोटीस बजावलेल्या 16 आमदारांच्या भवितव्याचा निकाल काय लागणार? याकडे  सर्वाधिक लक्ष आहे. 


आज लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष


दरम्यान, आज लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागणार की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार हे थोड्याच वेळात समजणार आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Political Crisis : घटनापीठासमोर असलेले 9 प्रश्न, महाराष्ट्राला नेमकं कोणतं उत्तर मिळणार?