Maharashtra Political Crisis:  सत्ता संघर्षाच्या निकालाचा महत्वाचा  दिवस आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे.  नरहरी झिरवाळ यांच्यांशी सध्या कुणाचाही संपर्क होत नसून ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला.  या नंतर राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर नरहरी झिरवाळ आपल्या गावीच असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाने एबीपी माझाला दिली आहे.


नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा नॉट रीचेबल झाले आहेत.  नरहरी झिरवाळ फोन बंद करून  करून  अज्ञातस्थळी रवाना झाले अशा चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र नरहरी झिरवाळ नाशिकमधील दिंडोरी आपल्या गावीच असल्याची माहिती कार्यालयाने दिली आहे.  मात्र नरहरी झिरवाळ यांचा फोन नॉट रिचेबल आहे.  नरहरी झिरवाळ  हे अजित पवार दिंडोरी तालुक्यातील एका कंपनीमधे असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. नरहरी झिरवळ त्यांच्यासोबत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.


राजकीय चर्चांना उधाण


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics)  बदलवणारा हा निकाल असणार आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून यावर सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्ष सुरु आहे. अशातच आज  या सत्तासंघर्षांवर निकाल दिला जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे झिरवाळ नेमके नॉट रिचेबल असल्याने राजकीय  चर्चांना उधाण आले आहे. 


संजय राऊतांचे सूचक वक्तव्य 


16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय आज लागणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रीचेबल आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज  वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!' अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे.


कोण आहेत नरहरी झिरवाळ?


नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख आहे.