मुंबई : देशातून भाजपला हद्दपार करायचं आहे. देशाचं होत असलेलं नुकसान वाचवायचं आहे. यासाठी आम्हाला कोणासोबतही आघाडी करण्याची वेळ आली तरी देखील आम्ही करू, अशी प्रतिक्रिया एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. नुकतीच अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने शिवसेनेची मदत घेतली असल्याची बाब समोर आली आहे. त्यासंदर्भात बोलताना इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली.
खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता ते म्हणाले की, "अमरावती महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत एमआयएम पक्षाची सेने सोबत युती पाहिला मिळाली आहे हे खरं आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, स्थानिक पातळीवरील गणितं वेगळी असतात. यामध्ये वरिष्ठ स्तरावरील नेत्यांचा काही विषय नसतो. विकास कामे करत असताना कुणाची मदत घेऊ शकतो, याचा विचार स्थानिक पातळीवरील नेते करत असतात. अमरावतीच्या या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना शिवसेनेची मदत घेणं योग्य वाटलं असेल जेणेकरून विकासकामे करता येतील. हा निर्णय केवळ त्या अनुषंगाने झाला आहे. आम्हाला सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी कुणाशीही आघाडी करायची वेळ आली तर आम्ही नक्कीच ती आघाडी करण्यासाठी तयार आहोत. फक्त भाजप सत्तेत येऊ नये."
आगामी काळात अनेक महानगर पालिकेच्या निवडणुका येत आहेत. यामध्ये औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई महानगर पालिका यांचा समावेश आहे. याठिकाणी अशा पद्धतीचं चित्र पाहिला मिळेल का? या प्रश्नाला उत्तर देताना जलील म्हणाले की, "आम्ही निवडणुका स्वतंत्र लढणार आहोत. औरंगाबाद तर आमचा गड आहे. त्यामुळे तिथला तर विषय येत नाही. सेनेवर हिंदुत्ववादी पक्ष राहिला नाही, अशी टीका व्हायला लागली आहे. याला उत्तर देताना जलील म्हणाले की, हा निर्णय केवळ स्थानिक पातळीवरील आहे. याचा अर्थ असा नाही की आमची शिवसेनेसोबत आघाडी झाली आहे. आता सेनेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. आता एमआयएम देखील एक पाऊल पुढं टाकेल का? याला उत्तर देताना इम्तियाज जलील म्हणाले की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू, कोणतीही आघाडी उदयास येणार असेल तर एमआयएम पक्ष याच नक्कीच स्वागत करेल. काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा हॉस्पिटल बांधा असं तुम्ही म्हंटला आहात? या प्रश्नाला उत्तर देताना जलील म्हणाले की, कोरोना काळात आपण पाहिलं आहे की, हॉस्पिटल कमी होते, व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. आशा वेळी 400 कोटी रुपये केवळ स्मारकासाठी देणं योग्य वाटत नाही. त्याऐवजी 100 -100 कोटीचे चार हॉस्पिटल तयार करा. हवं तर त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, कन्नडीगांच्या उन्मादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Coronvirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागात दोन शिफ्टमध्ये काम
Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्या प्रकरणातील फरार बाळ बोठेंना तीन महिन्यांनंतर अटक