नाशिक : जीवनावश्यक सेवा वगळता नाशिक जिल्ह्यातील दारूच्या दुकानांसह सर्व दुकाने शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहेत. यासोबतच शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात येणार आहेत. एकप्रकारे लॉकडाऊनसारखे चित्र बघायला मिळणार आहे.


नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून देशातील सर्वाधिक 10 कोरोना बाधित शहरांच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नाशिक महापालिकेने कोरोनाला अटकाव करण्यासाठी मास्टर प्लान केला आहे. 


नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय आणि त्यातच नाशिक शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे, देशातील सर्वाधिक 10 कोरोनाग्रस्त शहरांच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे. गेल्या 7 दिवसांत शहरात तब्बल 3 हजार 966 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर अॅक्टीव्ह रुग्णसंख्याही 4 हजार 966 वर जाऊन पोहोचली आहे. शासनाने कोरोना बाबत घालून दिलेल्या नियमांचे नागरिक पालन करत नसल्याने नाशिकमध्ये विकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली आहे.  


विशेष म्हणजे, राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. नाशिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. त्यानुसार पालिका आयुक्तांनी आज तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्य आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.  


पाहा व्हिडीओ : Nashik Corona Control | कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक महापालिकेचा मास्टर प्लॅन



नाशिक महापालिकेचा मास्टर प्लान :



  • होम आयसोलेशन न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार

  • कॉमन, कमांड कंट्रोल रूम सुरु केली जाणार

  • 2 विशेष हेल्पलाईन नंबर जारी केले जाणार

  • शहरातील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार

  • 15 दिवसांत पालिकेची बिटको रुग्णालयात सॅम्पल टेस्टिंग लॅब कार्यान्वित होणार, दररोज 2 हजार सॅम्पल तपासणी होणार

  • नोडल अधिकाऱ्यांकडून खाजगी लॅब्जकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्ट्सची तपासणी होणार

  • निर्बंध न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर पालिका प्रशासन आणि पोलीस यांच्यावर संयुक्त कारवाई करतील

  • शिस्त न पाळता चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार    


एकंदरीतच काय तर मुख्य सचिवांनी कान टोचल्यानंतर का होईना पण नाशिक महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवसांत शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नाशिक 100 टक्के लॉकडाऊन करायचे की, नाही याबाबत निर्णय घेऊ असंही आयुक्तांनी स्पष्ट केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.    


दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिका आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. या मास्टर प्लानची अंमलबजावणी आता कशी होते हे पाहण महत्वाचं तर ठरणारच आहे. मात्र यासोबतच नाशिक पूर्ण लॉकडाऊन करायचे की सर्व खबरदारी घेत कोरोनाला हरवायचे, हे आता नाशिककरांच्याच हाती आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :