मुंबई: दिल्लीतील संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आज देशभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आतापर्यंत सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आजच्या या चक्का जाम आंदोलनाला महाराष्ट्रातही भरघोस पाठिंबा मिळाला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी केंद्र सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत.


शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपूरात विविध संघटनांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. नागपूरच्या इंदोरा चौकात शीख समाज आणि विविध संघटनांच्या वतीनं रस्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला असून आंदोलकांचं रास्ता राको शांततेत सुरु आहे. यावेळी केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.


कोल्हापूरात राजू शेट्टींचा सरकारला इशारा
कोल्हापूरात स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतलं.


सेलिब्रेटींनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, "सेलिब्रिटी हे सरकारचे लाभधारक आहेत म्हणून ते टिव्ह-टिव्ह करत आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावे तुमची सेलिब्रिटी बिरुदावली ही कोट्यवधी लोकांच्या जीवावर आणि प्रेमावर तयार झाली आहे. तुम्ही स्वार्थासाठी सरकारची बाजू घेणार असाल तर तुमचं तुणतुणं बंद होईल आणि तुम्हाला कुत्रं सुध्दा विचारणार नाही."


Farmer Protest : शेतकऱ्यांचा आज देशभर चक्का जाम, संयुक्त शेतकरी मोर्चाकडून 'हे' आवाहन


कृषी कायद्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. ते म्हणाले की, "केंद्र सरकारला ज्या-ज्या ठिकाणी आडवावे लागेल तिथं आम्ही आडवू. राक्षसाचा जीव पोपटामध्ये आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे सरकारला उत्पन्न मिळण्याचे साधन असणाऱ्या आयकर भवन आणि जीएसटी भवनला आम्ही घेराव घालू."


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवार धुंदलवाडी येथे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली माकपानं रास्ता रोको केलं आहे. वर्धा ते नागपूर मार्गावर पवनार येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पवनार येथे काही काळ रस्ता धरला रोखण्यात आला. त्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली.


पुण्यात शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. तसेच हडपसर आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरही आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान कृषी कायदे रद्द करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


केंद्र सरकारने लागू केलेले तिनही कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज निफाड येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. गाझीपुर बॉर्डरवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितलं. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणांचा यावेळी स्वाभिमानाच्या वतीने निषेध करण्यात आला.


बुलढाणा जिल्र्ह्यात स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना काल मध्यरात्री पोलिसांनी स्थानबद्ध केलं. स्वाभिमानीतर्फे रेल्वे रोको करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यांतर आंदोलनाच्या धसक्याने शेगाव शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहे.


लातूरमध्येही शहरात येणाऱ्या चार मुख्य रस्त्यावर चक्का जाम करण्यात आला आहे. याचा फटका एसटी महामंडळाला बसला असून पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे.


दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आजच्या चक्का जाम आंदोलनाला पाठींबा म्हणून परभणीत दोन ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणी-गंगाखेड महामार्गावरील पिंगळगढ नाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तर पोखर्णी फाटा येथे शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान या दोन्ही आंदोलनामुळे परभणी-गंगाखेड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती


शेतकऱ्यांच्या 'चक्का जाम'ला काँग्रेसचा पाठिंबा, राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं...