मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करत अनेकांचं लक्ष वेधलं. देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांपासून ते अगदी त्यांनी शरजील उस्मानीनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही त्याचा समाचार घेतला. नाशिक - शिवसेना वैद्यकिय कक्षाच्या उदघाटनसमयी ते बोलत होते.


एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजीलविरोधात पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानंतर आता त्याच्या अटकेची मागणीही जोर धरु लागली. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी 'उस्मानी घाण उत्तर प्रदेश मधून आली, योगी आदित्यनाथ यांनी तिकडेच थांबवली असती तर असे घडले नसते. सध्या तो अलिगढमध्ये आहे आहे. त्यामुळं युपी पोलीसांनी मदत करावी', असं स्पष्ट मत मांडलं.


शिवाय यापुढं एल्गार परिषदेला परवानगी द्यायची की नाही याचाही विचार करावा लागेल, असं म्हणत पोलिसांनी याबाबतची भूमिका घ्यावी असं त्यांनी ठणकावलं.


शेतकरी आंदोलनाचं सरकारला गांभीर्य नाही


शेतकरी आंदोलनाचा सरकारकडून गांभीर्यानं विचार केला जात नाही, असं म्हणत भविष्यात आणखी लाखो शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर येतील ही बाब स्पष्ट केली. खुद्द शरद पवार यांनीही शेतकरी हिंसक होतील असा इशारा दिला आहे. त्यामुळं आता केंद्र ते हिंसक होण्याची वाट पाहत आहे का असा थेट सवाल केला.


बहुमताचा अहंकार बरा नव्हे, असं सूचक वक्तव्य करत त्यांनी पुन्हा एकदा केंद्राला सज्जड इशारा दिला.