Jitendra Awhad : नवी मुंबईतील कोपरी उड्डाणपुलासाठी वाशीतील 400 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार असल्याने याविरोधात आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. पर्यावरण प्रेमींनी मनपाच्या या वृक्षतोडणीला कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी ट्विट करत याच्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. नेमकं प्रकरण काय?
400 वृक्षांची कत्तल करून उड्डाणपूल उभारणीचा घाट का घातलाय?
गरज नसताना नवी मुंबईतील कोपरी उड्डाणपुलाचा घाट घातला जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. आता या वादात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली असून आव्हाड यांनी काल घटनास्थळाची पाहणी करत सर्व झाडांची व तेथील वाहतूक संदर्भातील समस्येचा आढावा घेतला. याठिकाणी प्रशस्त रस्ते असून वाहतूक कोंडी देखील होत नाही. असे असतानाही मनपा 363 कोटी रुपये खर्च करत 400 वृक्षांची कत्तल करून उड्डाणपूल उभारणीचा घाट का घातलाय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा निर्णयाने हरित नवी मुंबईची ओळखच संपुष्टात येईल, त्यामुळे याप्रकल्पाचा कडाडून विरोध करू अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
हरित पट्टा ठेवण्याची मागणी
400 वृक्ष तोडून उड्डाणपूल बांधण्यास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान आव्हाडांनी झाडांची पाहणी करीत हरित पट्टा ठेवण्याची मागणी केली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, उगाच कारण नसताना 365 कोटी रुपयांचा उड्डाणपूल उभारायचा, 400 हून अधिक झाडे तोडायची. याच्यासाठी काही पर्याय निघू शकतो का हे बघणं फार महत्वाच आहे. एकीकडे उष्णता वाढू लागली आहे, आर्दता वाढू लागली आहे. याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. असे सांगत आव्हाडांनी चिंता व्यक्त केली आहे.