मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, खासदारकीसाठी शिवबंधन बांधणार का?
संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. संभाजीराजे छत्रपती आज दुपारी 12 वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे. सध्यातरी राजेंचा शिवसेना प्रवेशास नकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे सर्व मराठा समन्वयकांशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.
औरंगाबादेत भाजपचा जल आक्रोश मोर्चा
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून दुपारी 4 वाजता भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये महिला दूषित पाणी आणि डोक्यावर हंडे, घागरी घेऊन सहभागी होतील.
दरम्यान, काल रात्री औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचे बॅनर फाडण्यात आले आहेत. भाजप कार्कर्त्यांनी घटनास्थळी जमून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. व्हीज आलेत.
ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी
ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे सोपवली आहे. या प्रकरणी 5 महिलांच्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. तसेच, काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉ. कुलपति तिवारी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याबाबत वाराणसी कोर्टात याचिका करणार आहेत.
ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदीरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदीरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदीरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलंय.
नवनीत राणांचा आज संसदीय अधिकार समितीसमोर जबाब
खासदार नवनीत राणांनी जेलमध्ये असताना त्यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे 25 एप्रिल रोजी तक्रार केली होती. त्याच तक्रारीची दखल घेत आज दुपारी 12 वाजता खासदार नवनीत राणा यांना हजर राहण्याची नोटीस बजावली गेली आहे. खासदार नवनीत राणा आज आपल्या जबाबामध्ये काय भूमिका मांडणार हे पाहावं लागेल.
केंद्रानंतर राज्य सरकारकडूनही पेट्रोल डिझेलवरचा कर कमी, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
राज्य सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लीटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत
मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
काँग्रेस टिळक भवन येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची नाना पटोलेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विकासनिधी वाटप, ओबीसी प्रश्नावरुन असलेला रोष या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन इशारा देणारे पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ओबीसी विभागाकडून ओबीसी आक्रोश आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात
पुणतांबा येथे आज विशेष ग्रामसभा होणार आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने पुन्हा शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या ग्रामसभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. पुणतांबा हे ऐतिहासिक शेतकरी संपाचे गाव असून 5 वर्षांपूर्वी या गावानं शेतकरी संप पुकारला होता.
पंतप्रधान मोदींचा जपान दौरा आजपासून...क्वाड शिखर संमेलन, बायडन भेटीसह अनेक महत्वाच्या बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 आणि 24 मे असे दोन दिवसांच्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फूमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान एंथनी अल्बानीस यांची भेट घेणार आहेत.
मोदींचा आजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
- पहाटे 4.20 वाजता- मोदींचं टोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन.
- पहाटे 5 वाजता- मोदींचं जपानमधील भारतीयांकडून स्वागत केलं जाणार आहे.
- सकाळी 10.30 ते 12.20- मोदींच्या सुजुकी, एनईसी, UNIQLO, सॉफ्टबैंक ग्रुप कॉर्प या कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठका होणार आहेत.
- दुपारी 1 वाजता- मोदींच्या हस्ते इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक पार्टनरशिपचा शुभारंभ होणार आहे.
- दुपारी 2 वाजता- जापानी व्यापार वर्गासोबत गोलमेज संमेलनाला मोदींची हजेरी.
- दुपारी 4 वाजता- जपानमधील भारतीय समुदायासोबत मोदी बातचित करतील.
आंतरराष्ट्रीय-
लंडन- काँग्रेस नेते राहुल गांधी केंब्रिज विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ‘भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष’ या विषयावर संवाद साधणार आहेत, भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता हा संवाद आहे.