Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक -
राज्य मंत्रिमंडळाची आज बारा वाजता मंत्रालयात बैठक आहे. दिवाळीनिमित्त गरजूंना शंभर रुपयात वस्तु वाटप करणार आहेत. अद्याप पर्यंत अनेक भागांमध्ये या वस्तू पोहोचलेल्या नाही. त्यामुळे या योजने संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा एकदा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले या पार्श्वभूमीवरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद -
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद होणार. तपास यंत्रणा वेळकाढूपणा करतंय असा आरोप देशमुखांच्या वतीनं मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार याप्रकरणी राज्य सरकारनं सहकार्य करणं अपेक्षित आहे, मात्र तसे होत नसल्याचंही न्यायालयाला देशमुखांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं. सीबीआयच्या या वेळकाढू भूमिकेवर न्यायालयानंही त्यांना चांगलेचं सुनावलं. आम्हाला दिवाळी सुट्टीपूर्वी निर्णय द्यायचा होता. आम्ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाला बांधील आहोत, याचंही भान ठेवा अशा शब्दांत न्यायालयानं सीबीआयला फटकारलं होतं.
एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक -
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association Election) अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
मनसुख मांडविया अहमदनगर दौऱ्यावर -
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत...केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांच्या हस्ते डॉ. विखे पाटील कॅन्सर सेंटरचे लोकार्पण होणार आहे. सकाळी 11 वाजता, डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळद घाट, अहमदनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील , वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तान्हाजी सावंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहेत.
कोल्हापुरात शिवसैनिकांचा मोर्चा -
कर्नाटक सरकारने कोल्हापुरातील कनेरीवाडी या ठिकाणी कर्नाटक भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोल्हापुरातील शिवसैनिकांनी विरोध केलाय...कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी नुकतीच कनेरी मठावर येऊन कर्नाटक भवनची घोषणा केली आहे... त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात कर्नाटक भवन होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे... उद्या याच संदर्भात कनेरी मठावर हजारो शिवसैनिक मोर्चा घेऊन जाणार आहे.
चित्रा रामकृष्ण आणि संजय पांडे यांना कोर्टात हजर केलं जाणार -
राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE)कर्मचाऱ्यांच्या कथित अवैध फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणात चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishan), रवी नारायण आणि मुंबई पोलीस माजी आयुक्त संजय पांडे यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. एवेन्यू कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे.
सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी -
आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सत्येंद्र जैन यांच्या जामीनाला ईडीनं विरोध केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र यांच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी 9:45 च्या सुमाराला केवडिया येथे पंतप्रधानांच्या हस्ते लाईफ अभियानाचा (मिशन LiFE)शुभारंभ होईल. दुपारी 12 च्या सुमाराला पंतप्रधान केवडिया येथे 10व्या मिशन प्रमुखांच्या परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर, दुपारी 3:45 च्या सुमाराला ते व्यारा येथील विविध विकास उपक्रमांची पायाभरणी करतील.
T20 वर्ल्डकप 2022
नेदरलँड विरुद्ध श्रीलंका, जिलॉन्ग, सकाळी 9.30 वाजता
नामेबिया विरुद्ध यूएई, जिलॉन्ग, दुपारी 1.30 वाजता