Anil Deshmukh :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय (CBI) कोर्टात युक्तीवाद होणार आहे. सीबीआयकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. ईडीच्या (ED) प्रकरणात जामीन मिळाल्यानतंर सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यातही जामीन मिळावा अशी विनंती अनिल देशमुखांनी केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.  सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. यावर आता लवकर निर्णय घेण्याची मागणी देशमुख यांच्या वकीलांनी केली आहे. 


ईडीकडून देशमुखांना दिलासा मात्र, सीबीआयचा जामीन अर्जाला विरोध


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार एका आठवड्यात या जामीन अर्जावर निर्णय देण्यात यावा, अशी विनंती अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. जर सरकारी पक्ष सहकार्य करणार नसेल तर हे कसं शक्य होणार? असा सवालही देशमुखांच्या वकिलांनी केला होता. तसेच सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यास चालढकल सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर ही सुनावणी गुरुवारपर्यंत (20 ऑक्टोबर) तहकूब करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख हे गेल्या अकरा महिन्यांपासून मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांप्रकरणी जेलमध्ये होते. त्यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टाने गेल्या आठवड्यात दिलासा दिला होता. ईडीने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला होता. पण सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता.  


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या खंडणीच्या वसुली प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडीने आणि सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. त्यावर ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्या विरोधात एक याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.


नेमकं प्रकरण काय?


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब, 20 ऑक्टोबरला सीबीआयचा युक्तीवाद