MLA Sanjay Kute : सध्याच्या राजकीय घडामोडीत भाजपचे आमदार डॉ.संजय कुटे दूर गेल्याचं समजतंय. मंत्रिपद न मिळाल्याने ते सध्या नाराज आहेत का? भाजपा प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता होती, ते ही पद न मिळाल्याने नाराज आहेत का? शिंदे गट फुटून बाहेर पडला, त्या सर्व घडामोडीचे एकमेव साक्षीदार भाजपा आमदार डॉ.संजय कुटे सध्या आहेत तरी कुठे? एबीपी माझा सोबत बोलताना कुटे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काय म्हणाले?


आमदार किंवा सरकार फोडण्यामागे माझा काहीही संबंध नाही - कुटे


आमदार संजय कुटे म्हणाले, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी सुरत गेलो असता, तिथं मला माझे जवळचे मित्र असलेले शिवसेनेचे आमदार भेटले व ते म्हणाले की तुम्ही आमच्या सोबत राहा. गेली 18 वर्ष आम्ही पक्ष विसरून मित्र होतो व दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षात आमच्यात दुरावा निर्माण झाला होता. ते भेटल्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो......आमदार किंवा सरकार फोडण्यामागे माझा काहीही संबंध नाही. माझा सहभाग होता हा मीडियाचा गैरसमज आहे.


मंत्रिपद न मिळाल्याने नाराज? संजय कुटे यांच उत्तर...


भाजपा ही काही एका घरातून चालणारी पार्टी नाही, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आणि ज्या प्रक्रियेमध्ये की कुणाला पद द्यायचं किंवा नाही? किंवा कुणाला कोणती संधी द्यायची या सर्व कोअर कमिटीच्या टीममध्ये मी स्वतःच असल्याने व मीच घेतलेल्या निर्णयावर मी नाराज कसा असेन? आमच्या कडे कायमस्वरूपी संधी कुणालाच मिळत नाही, फक्त तीन वर्षासाठी संधी मिळते. आणि मंत्रीपदाचीही कुणाला यावेळेस मिळते कुणाला पुढच्या वेळेस मिळते. आणि हे ठरविण्याचीच जवाबदारी आमच्या कोअर कमिटीकडे होती आणि आम्ही तसे निर्णय घेतले, त्यामुळे मी स्वतः माझ्या निर्णयामुळे मीच नाराज कसा? हे सर्व निर्णय कार्यकर्त्यांच्या विचारविनिमयातून निर्णयातून घेतले जातात. असं कुटे म्हणाले.


2024 साली टार्गेट समोर 


चंद्रशेखर बावनकुळे हे व्हीजन असणारे नेते आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनेला सोबत घेऊन 2024 मध्ये जनतेच्या मनातील सरकार स्थापन करू व पुढची सत्ता आमचीच असणार आहे. बावनकुळे एक ओबीसी नेता असल्याने येणाऱ्या 2024 साली आम्ही एक टार्गेट समोर ठेवलं आहे...ते म्हणजे येणाऱ्या विधानसभेत 200 प्लस आणि लोकसभेत 45 प्लस हे टार्गेट आम्ही बावनकुळे यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करू.


ओबीसी समाजाचे प्रश्न कसे सुटतील?


ओबीसी समाजचे प्रश्न भाजपा शिवाय कुणीही सोडविलेलें नाहीत. कारण भाजपात ओबीसी नेतृत्व चांगलं फळत फुलतं. काही नाराज होतात.आम्ही ध्येय धोरणावर काम करणारे लोक असल्याने आम्ही नाराजी वैगैरे मानत नाही. ओबीसींच पहिलं मंत्रालय हे महाराष्ट्रात स्थापन झालं. मी मंत्री असताना ओबीसींचे खूप प्रश्न मार्गी लागले होते, पण या तीन वर्षीय मविआने तो कोणताच विषय पुढे नेला नाही. पण आता ओबीसींच आरक्षण सुद्धा देवेंद्र फडणवीसांमुळे पुन्हा मिळालं आहे. आम्ही तीन वर्षांपासून त्यांना आरक्षणाची प्रोसेस सांगत होतो, पण ते ऐकत नव्हते शेवटी आम्हालाच तिथं यावं लागलं आणि ते करावं लागलं. ओबीसींचे होस्टेलचे, विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आम्हाला ज्ञात आहेत आणि हे सरकार पुढच्या अडीच वर्षात ते सर्व प्रश्न मार्गी लावेल.


परिस्थितीनुसार मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवू.
गडकरी साहेब हे मोठे नेते आहेत ते दिलखुलासपणे स्टेस्टमेंट देतात. त्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री होतोच असं नाही. आणि नाही होत असंही नाही. पण आज तरी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यात काम सुरू आहे. आणि केंद्रीय नेतृत्व ठरवेल त्यावेळी ते केंद्रात जातील आणि मग त्यावेळी आम्ही परिस्थितीनुसार मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवू.


पुढचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा होईल?


ओबीसी समाजात जन्म घेतला म्हणजेच तुम्ही ओबीसींचे नेते झालात असं नाही. पण ओबीसी मुख्यमंत्री व्हावा ही सर्वांची इच्छा आहे, पण आज आमच्यासाठी ओबीसींचा सर्वात मोठा नेता देवेंद्रजी आहेत. आज ओबीसींचा विचार करणारा नेता देवेंद्रजी पेक्षा दुसरा नेता राज्यात नाही.


पार्टीने तुमचा वापर करून घेतला ? संजय कुटे म्हणाले...


आम्ही एका विचारांवर काम करणारे लोक आहोत. पार्टीने आम्हला काय दिल यापेक्षा मी पार्टीला काय दिल हे बघणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे काय मिळालं आणि नाही मिळालं हे महत्वाचे नाही. त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतले आहेत. मी अनेकदा सांगितलं की ही पार्टी एका घरातून चालत नाही. भाजपात युज एन्ड थ्रो कधीच होत नाही. मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा व काम करत राहावं. नक्कीच येणाऱ्या काळात चांगलंच होईल, असा सूचक इशारा ही आ.डॉ.संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.