Kolhapur News : कोल्हापूर येथील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशात आणि राज्यात आकर्षण ठरलेला 303 फूट उंचावरील राष्ट्रध्वज काल फडकवण्यात आला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील व विशेष निमंत्रित ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रीमती मीनाताई गुरव, वसंतराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस विभागाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली. 


देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज हा कोल्हापूरमध्ये आहे. ध्वज उंचावर असल्याने त्याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे काही कालावधीसाठीच हा ध्वज डौलाने फडकला आहे. तसेच दुरुस्तीचा खर्चही अधिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वर्षभर तिरंगा डौलाने फडकण्यासाठी उंचीवरही न फाटणाऱ्या कापडाचा ध्वज परदेशातून मागवण्यात येणार असल्याची  माहिती  चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. त्यामुळे ध्वज वर्षभर पोलिस उद्यानात डौलाने फडकत राहणार असल्याचे ते म्हणाले. या कापडाची किंमत सुमारे साडे चार लाख रुपये असणार आहे. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणाची आहुती दिली. अनेकांच्या त्याग, बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा शासकीय पातळीवरच न राहता लोकसहभागातून राबविण्यावर भर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. याचसाठी राष्ट्रध्वज उभारण्यासाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आले, असे सांगून कोल्हापूर मधील पोलीस उद्यानातील 303 फूट उंचीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह मेहनत घेतलेल्या चमुचे त्यांनी कौतुक केले.


यावेळी बोलताना पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.  


कोविडमुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गतः साधनसंपत्ती आहे. विविध संस्थांच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती सारखे अनेक चांगले उपक्रम याठिकाणी होत आहेत. अशा मोहिमांत नागरिकांचा सहभाग वाढवण्याबरोबरच अन्य महत्वपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 


राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अंजलीताई पाटील, समरजितसिंह घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वज उभारण्यासाठी मेहनत घेतलेले तंत्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.