Vinayak Mete Funeral : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचं अपघाती निधन झालं. मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मेटे यांचं पार्थिव आज बीडमध्ये नेण्यात येणार असून तिथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवसंग्रामचे मुंबईचे अध्यक्ष राजन घाग यांनी ही माहिती दिली आहे. विनायक मेटे यांचं पार्थिव मुंबईतून बीडला नेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सनं बीडला नेणार आहेत. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान पनवेलच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये विनायक मेटे यांच्या पोस्टमार्टमसाठी आवश्यक एक इंजेक्शन मिळत नाहीय. त्यामुळे पार्थिव जे जे रुग्णालयात नेण्यात येईल. त्याठिकाणी पोस्ट मार्टम पार पडेल आणि तिथून वडाळा येथील निवासस्थानी नेण्यात येईल.


असा होता विनायक मेटे यांचा कालचा कार्यक्रम..


मेटे यांनी बीड शहरातल्या शिवसंग्राम भवनमध्ये काल सकाळी 11 वाजता तिरंगा रॅली संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ गावी राजेगावला गावाकडे जाऊन घरी भेट दिली.  राजेगाव केजला आल्यानंतर केजमध्ये चार वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. केज होऊन अंबाजोगाईला गेल्यानंतर अंबाजोगाईमध्ये कार्यकर्त्यासोबत 6 वाजता रेस्ट हाऊसला बैठक घेतली. कालचे रात्रीचे जेवण नऊ वाजता अंबाजोगाईच्या रेस्ट हाऊस वर केले. त्यानंतर अकरा वाजता बीडला पोहोचले आणि त्यानंतर पुढे आजच्या होणाऱ्या मुंबईच्या मीटिंगसाठी निघाले. विनायक मेटे त्यांची आज अकरा वाजता बीड शहरामध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र अचानक मुंबईमध्ये आज मराठा आरक्षणासाठी बैठक लावल्याने ते मुंबईला गेले. मेटे हे कार्यकर्त्यांना सांगून गेले की ते त्या रॅलीला उपस्थित राहू शकत नाहीत.


मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू


मेटे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मेटे यांच्या अपघातानंतर या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 


असा झाला अपघात 


विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची पाहणी करत आहेत. चौकशीसाठी 8 पथकं नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे. 


कोण होते विनायक मेटे

 

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.

मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. 

अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार 
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य