Politics : भिवंडी काल्हेर येथे मुंबई महापालिकेच्याच मालकीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असून त्यास मंजुरी दिल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांना कामाचे श्रेय लाटण्याची सवय असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्याने केलाय.
श्रेयवादाची लढाई
शुक्रवारी स्थानिक खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महापालिकेच्या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून केला. त्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी हे काँक्रीट करण्याचं काम मागील दोन वर्षांपासून आम्ही केलेल्या पाठपुरामुळे शक्य झाले असल्याचं सांगत त्याच जागेवर गोमूत्र शिंपडून स्थानिक ग्रामस्थ महिलांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ नारळ वाढवून केला आहे.
'ते जेथे नारळ फोडतील तेथे आम्ही जाऊन शुध्दीकरण करणार'
या कामाचा पाठपुरावा आम्ही स्थानिकांसोबत केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. कोणत्याही कामाला मंजुरी मिळाली,दरम्यान विकासकामांना कोणीही मंजुरी मिळवली की काम अंतिम टप्प्यात येते, त्यानंतर कपिल पाटील हे फक्त नारळ फोडून श्रेय लाटण्याचे काम करतात. या कामासाठी आम्ही केलेला पाठपुरावा कागदपत्रे पुरावे आमच्या जवळ आहेत. राज्य शासन, जिल्हा परिषद यांनी केलेल्या कामाचे श्रेय सुध्दा कपिल पाटील यांनी घेण्याचा सपाटा लावल्याने यापुढे ते जेथे नारळ फोडतील तेथे आम्ही जाऊन शुध्दीकरण करणार, तसेच यांना जशास तसे उत्तर देणार असा इशारा सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे.
भिवंडी मतदार संघांचे संभाव्य उमेदवार काँग्रेस नेते दयानंद चोरगे संतप्त..
भिवंडी मतदार संघांचे संभाव्य उमेदवार काँग्रेस नेते दयानंद चोरगे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. दयानंद चोरगे यांनी सांगितले की दिल्लीत मी कोणाचीही तक्रार करण्याकरिता आलो नाही. राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमचे मार्गदर्शक असून नाना पटोले यांची तक्रार करण्याकरिता मी बिलकुल आलो नव्हतो. ज्यांनी खोडसाळ बातमी दिल्याने दयानंद चोरगे संतप्त झाले. त्यांनी ही वृत्त देणाऱ्या विरोधात नोटीस देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.