Wardha Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024)पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्व पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची घोषणा जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने वर्धा लोकसभेच्या (Wardha Lok Sabha) संभाव्य उमेदवाराबाबत घोषणा करण्यात आली आहे. यात वंचितच्या (VBA) जिल्हा कार्यकारिणीत ठराव घेऊन प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्ह्णून घोषणा  करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्राचार्य राजेंद्र साळुंखे  यांचे नाव उमेदवारीबाबत पक्के करण्यात आले आहे. संभाव्य उमेदवार जाहीर करण्याबाबत स्वत: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हिरवी झेंडी दिल्याची माहिती जिल्हा कार्यकारीणीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. 


वर्ध्यात वंचितचा संभाव्य उमेदवार जाहीर


एकीकडे महाविकास आघाडीचा तिढा सुटला नाही, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा कार्यकरिणीला संभाव्य उमेदवार घोषित करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. वर्धा जिल्ह्यात लोकसभा उमेदवार घोषित केल्याने सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, उपाध्यक्ष सुभाष खंडारे यांनी उमेदवाराची घोषणा केल्याने आता यावर महाविकास आघाडी काय भूमिका घेते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतचा तिढा कायम असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. असे असतांना वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात सभांचा धडाका लावला आहे. मार्चच्या पहिल्याच पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच सभा होणार असून या सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाची मोर्चे बांधणीला देखील सुरवात केली असून संभाव्य उमेदवारांचे नाव जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. 


सांगलीत वंचितचा उमेदवार 'फायनल'


सांगली येथे 14 किंवा 15 मार्च रोजी प्रकाश आंबेडकरांची सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना वंचितच्या वतीने उमेदवारी देण्याबाबत जवळ जवळ पक्क झाले असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा वंचितच लढणार असल्याची माहिती देखील वंचितच्या सूत्रांनी दिलीय. महाविकास आघाडीकडे प्रकाश आंबेडकर सांगलीची मागणी करणार आहे.  या अनुषंगाने मागच्या महिन्यात चंद्रहार पाटल  यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट देखील घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात उमेदवारीसंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र चंद्रहार पाटलांची उमेदवारी बाबत या आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  


वंचितचा महाविकास आघाडीत समावेशाबाबत संजय राऊत काय म्हणाले?


वंचितला  महाविकास आघाडीत सामील केले असल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या 5 किंवा 6 मार्चला उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि कांग्रेस नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीत अंतिम फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अशातच शिवसेना उभाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यावर आता कोणतीही बैठक होणार नाही. याचा अर्थ जागावाटपाचे निर्णय झालेले आहेत. वंचितने जागांचा प्रस्ताव दिलाय त्यावर प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट केलेच आहे. लवकरच शरद पवार, उध्दव ठाकरे व काँग्रेस नेत्यांसह आंबेडकर यांची बैठक होणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या