Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेविरोधात शिंदे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं 11 जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. आषाढीच्या (Ashadhi wari) तोंडावर राजकीय पेच सुरु असतांनाच, महापूजा कोण करणार? ठाकरे की फडणवीस यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आज न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे.
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती.
शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार : अमोल मिटकरी
पंढरपूरच्या शासकीय महापूजा कोण करणार? ठाकरे की फडणवीस यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, आज न्यायालयाच्या सुनावणीनंतर आमदार अमोल मिटकरींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही शासकीय महापूजा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या राज्यात असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? याची उत्सुकता लागली आहे. जर महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही तर राज्यात नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. नवे सरकार आले तर हा शासकीय महापूजेचा मान नव्या मुख्यमंत्र्याला मिळण्याची शक्यता आहे. मात्र अवघ्या 13 दिवसांवर आषाढी आली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी ज्या वेगाने सुरू आहे ते पाहता आता येणारा काळ ठरवेल की पूजा होणार आहे की नाही?