Nashik News : नाशिक मनपाने सुरु केलेली सिटीलिंक बससेवा विस्तारात असून आता लवकरच नाशिकच्या हद्दीबाहेर म्हणजेच नाशिक ते कसारा हि बससेवा सुरु करण्यात येणार आहे. हि सेवा सुरु करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला असला तरी हि सेवा सुरु होईल का नाही याबाबत साशंकता आहे.
नाशिक शहरातील शहर परिसरातील प्रवाशांना अधिकाधिक चांगली सोय देण्यासाठी आता महापालिका हद्दीबाहेर मात्र सर्वाधिक प्रतिसाद मिळणाऱ्या नाशिक कसारा मार्गावर लक्ष केंद्रित केले असून या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह परिवहन महामंडळ विभागाकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे अर्थात यासाठी शासन त्याला मान्यता देईल किंवा नाही याबाबत अद्यापही ठोस काही शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी नाशिक महानगर परिवहन महामंडळाने सिटीलिंक ही सेवा सुरू करताना महापालिका आधीपासून २० किलोमीटर अंतरापर्यंत ग्रामीण भागात बस सेवा सुरू करण्याची परवानगी घेतली होती. त्यानंतर नाशिकमध्ये ही सेवा सुरू करतानाच नाशिक ग्रामीण भागातही ही सेवा सुरू करण्यात आली. त्याच वेळी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी संप केल्याने ग्रामीण भागातील बस सेवा ठप्प झाली होती. त्याचा फायदा घेत सिटीलिंकने सिन्नर, दिंडोरी, ओझर, सायखेडा, गिरणारे आणि त्र्यंबक अशा विविध भागात बस सेवा सुरू केल्या.
दरम्यान नाशिक शहरातील कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर मात्र शहरी भागाकडे लक्ष केंद्रित केले. यामुळे शहरातील विविध भागात सिटीलिंकने आपली सेवा सुरु केली. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील सिटीलिंकला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्र्यंबकेश्वर मार्गावर राज्य परिवहन महामंडळ आणि सिटीलिंकमध्ये स्पर्धा सुरू आहे. ती टाळण्यासाठी आता शहरी भागातील शाळा सुरू होत असल्याने त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे, मात्र त्यानंतर या आर्थिक तोटा कमी व्हावा यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना शोधल्या जात आहेत. त्यानुसार अत्यल्प उत्पन्न देणारे सेवा बंद करण्याच्या सूचना आयुक्तांनी गेल्या आठवड्यातील बैठकीत दिल्या. त्याचबरोबर नाशिक कसारा ही सेवा देखील सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाची पत्रव्यवहार करण्यास सुरुवात झाली आहे.
प्रस्ताव पाठवला मात्र शक्यता कमी
नाशिक सिटीलिंकचे अधिकारी म्हणाले कि, नाशिक ते कसारा सेवा करण्यासाठी मनपा आयुक्तांनी सूचना केल्यानंतर तातडीने राज्य शासनाच्या गृह, परिवहन विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार पाठपुरावा करण्यास सुरवात केली आहे. मात्र कसारा हे नाशिक मनपा हद्दीच्या बाहेर येत असल्याने यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यातही सिटीलिंकच्या बसेस तोट्यात असून अधिकच्या बसेस खरेदी करण्यावरही निर्बंध आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक बसेस खरेदीला प्राधान्य असणार आहे.