Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र झालेल्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन बाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले. आसाममध्ये पूरस्थिती असल्याने लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, आसामचे भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. 


आसाममध्ये आलेल्या पूरामध्ये आसामच्या नागरिकांचे हाल सुरू आहेत. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याची चिंता न करता आसाम सरकारने राज्यातील नागरिकांची चिंता करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये शिवसेना आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होत आहे. त्यांच्यावर खर्च करण्याऐवजी सरकारने पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने आसामच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले असल्याचे त्यांनी म्हटले.


आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे हॉटेल रॅडिसन्स बाहेर घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलीस सतर्क झाले. आसाम सरकारविरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी त्वरीत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. हॉटेलमध्ये शिरण्याचा आमचा इरादा नाही. मात्र, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे आसाममधील पूरस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 


दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांचे बंड वणव्यासारखे पसरले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 46 वर पोहचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: