Maharashtra Political Crisis: राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात राष्ट्रवादी,कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या शिवसेना आमदारांना मुंबईत बोलवण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे भाजप आमदारांना मतदारसंघातच थांबण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला आहे. सोबतच राज्य न सोडण्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणुकीत फडणवीसांनी राजकीय चमत्कार करून शक्य नसलेला विजय खेचून आणला. त्यांनतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुद्धा विरोधकांचे आमदार फोडून विजयाची पुनरावृत्ती केली. त्यामुळे भाजपच्या गटात आत्मविश्वास वाढला असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत भाजपकडून 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अशात भाजपच्या आमदारांना सुद्धा आपापल्या मतदारसंघातच थांबण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीला तरी भाजपचे आमदार शिवसेनेतील बंडाचा आनंद घेतांना दिसत आहे.
काहींना दुखः...
एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका पाहता पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपच्या एका गटात पुन्हा सत्तेत येण्याचा आनंद आहे तर दुसऱ्या गटात नाराजी आहे. कारण महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून ज्यांच्यावर सतत टीका केली, विरोधात आंदोलने केले आज पुन्हा त्यांच्याचसोबत जाण्याची वेळ आली आहे. तसेच शिवसेनासोबत आल्यावर अनेक भावी उमेदवारांचा पत्ता कट होईल. त्यामुळे शिवसेना नकोच अशी त्यांची इच्छा आहे.
स्थानिक निवडणुकीवर परीणाम....
राज्यातील घडामोडी पाहता याचा थेट परिणाम आगामी स्थानिक निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची हिंदुत्ववादी विचारसरणी असलेला पक्ष म्हणून ओळख आहे. असे असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस विचारसरणी वेगळ्या असूनही सोबत आले होते. त्यामुळे बऱ्याच निवडणुकीत याचे परिणाम पाहायला मिळाले. त्यामुळे आता शिवसेना-भाजप एकत्र आल्यास त्याचे वेगळे परिणाम सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.