Maharashtra Political Crisis Shivsena : शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व  बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. मात्र, ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार की ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. या बैठकीत आता शिवसेना आता उरलेल्या आमदारांच्या बळावर कोणते डावपेच आखणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आज गुवाहाटीवरून शिंदे यांच्या गटातून माघारी येत महाराष्ट्रात परतले आहेत. 


मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी बुधवारी जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्ष प्रमुखपद सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र, राज्याबाहेर गेलेल्या शिवसेना आमदारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांगावे, असेही म्हटले. फेसबुक लाइव्हनंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्या वर्षा ते  मातोश्री या दरम्यानच्या प्रवसात हजारो शिवसैनिक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. उद्धव ठाकरे यांनी काही ठिकाणी शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारले. 


मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरे आज बैठक घेणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी सकाळीदेखील काही शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार, काय रणनीती आखणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असून पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत.