नवी दिल्ली: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज होणार म्हणून सगळ्यांचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे असताना ही सुनावणी झालीच नाही. आता हे प्रकरण नव्या सरन्याधीशांच्याच काळात ऐकलं जाणार हे निश्चित आहे. सोमवारी याबाबत शिवसेनेचे वकील मेन्शनिंग करतील, त्यानंतरच घटनापीठ कधीपासून काम करतेय हे कळेल.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचं प्रकरण थंड बासनात जाणार का? सुप्रीम कोर्टात आज या प्रकरणाची सुनावणी न झाल्यानं पुन्हा ही शक्यता वाढलीय. त्यात सरन्यायाधीश रमण्णा हे शुक्रवारी 26 ऑगस्टला निवृत्त होतायत. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण नव्या सरन्यायाधीशांसमोरच जाण्याची शक्यता आहे.
मागच्या सुनावणीत हे प्रकरण 25 तारखेला लिस्ट करा असं स्वत: सरन्यायाधीशांनीच सांगितलेलं होतं. त्यानंतरही हे प्रकरण त्या तारखेला ने येणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे. उद्या सरन्यायाधीश रमण्णा यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता त्यांच्यापुढे हे प्रकरण मेन्शन न करता थेट सोमवारीच 29 ऑगस्टला मेन्शन होऊ शकतं.
याचा अर्थ स्पष्ट आहे की हे प्रकरण घटनापीठ ऐकेल हे तर सरन्यायाधीश रमण्णा यांनी सांगितलं. पण या घटनापीठात कोण कोण असणार, ते कधीपासून काम करणार हे मात्र नव्या सरन्याधीशांच्याच अधिकारात ठरण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरु असतानाच निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु राहणार का हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. तूर्तास तरी निवडणूक आयोगानं दोन दिवस काही निर्णय घेऊ नये असं कोर्टानं म्हटले होतं. पण ही स्थगिती किती काळ कायम राहणार यावर बरंच काही अवलंबून आहे.
नव्या घटनापीठाचं कामकाज कधी सुरु होणार याबद्दल आता अनिश्चितता आहे. सोमवारपासून देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत कारभार पाहणार आहेत. त्यामुळे आता नव्या सरन्यायाधीशांच्या काळात हे घटनापीठ काम करेल. पण हे घटनापीठ किती वेगानं काम करतं यावर बरंच काही अवलंबून असेल.
सत्तासंघर्षात आतापर्यंत काय-काय घडलं?
26 जून : अपात्रतेच्या नोटिशीला शिंदे गटाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
27 जून : बंडखोर आमदारांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा
29 जून : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
30 जून : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शपथ, शिंदे यांची निवड आणि विधानसभा अध्यक्ष निवडीला शिवसेनेचं आव्हान
11 जुलै : सुनावणी टळली, प्रकरण 'जैसे थेच'
20 जुलै : प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचे संकेत देत सुनावणी पार पडली
31 जुलै : सुनावणी पुन्हा लांबणीवर
3 ऑगस्ट : न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
23 ऑगस्ट : प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं.