Maharashtra Assembly Session : विधानसभेत आदिवासी आणि कुपोषित बालकांच्या प्रश्नावरून चर्चा सुरू असताना  शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या एका शब्दाने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याचे उत्तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिले. या उत्तरावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. विरोधकांमधील ज्येष्ठ सदस्यांसह आदित्य ठाकरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता, आपल्या पिताश्रींना लाज वाटली असे म्हणायचे का, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. 


आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एकही बालमृत्यू कुपोषणाने झालेला नसल्याची माहिती सभागृहात दिली. याबाबतची सर्व माहिती हायकोर्टात दिली असल्याचे त्यांनी म्हटले. यावर काँग्रेसचे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेत मंत्र्यांनी दिलेले उत्तर असंवेदनशील असल्याचे म्हटले. हे उत्तर म्हणजे आदिवासी समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेले उत्तर पटलावरून काढण्याची मागणी केली. त्यावर मंत्री विजयकुमार गावित यांनी वारंवार असंवेदनशील म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले.ही जबाबदारी सर्व मंत्रिमंडळाची असून फक्त अदिवासी विभागांची नसल्याचे सांगितले. 


या चर्चेत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री महोदय कुपोषणाबाबत चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. आदिवासी सामाजाची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला ही लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य आदित्य यांनी केले. आदित्य यांच्या या वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले. संसदीय भाषा वापरली पाहिजे असे म्हणताना मुनगंटीवार यांचा पारा चढला. लाज वाटली हा शब्द वापरला नाही पाहिजे. अडीच वर्ष कोण कोण सत्तेत होतं.-आपल्या वडिलांना लाज वाटली का, अस म्हणताय का? असा सवाल मुनगंटीवार केला. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी आदित्य यांच्या मदतीसाठी जयंत पाटील धावून आले. आदिवासी मंत्री यांच्या मदतीला वन मंत्री धावले आहेत. मात्र, त्यांनी गैरसमज करु नये असे पाटील यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनीदेखील आदिवासी समाजाची परिस्थिती बघताना राजकारणी म्हणून आपल्याला लाज वाटेल असं म्हणालो असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षांनी लाज वाटली पाहिजे हा असंसदीय शब्द असल्याचे सांगत  मी तपासून यावर निर्णय घेईल असे म्हटले. 


दरम्यान, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. 


पाहा व्हिडिओ: आदिवासी योजनांवरुन राडा, आदित्य ठाकरे विरुद्ध सुधीर मुनगंटीवार