Shivsena Vs Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या गोव्यावरून मुंबईला येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा दिली आहे. बंडखोर आमदार उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईमध्ये पोहोचणार असून त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. 


राज्यपालांनी उद्या म्हणजे गुरुवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटातील जवळपास 50 आमदार हे गुवाहाटीवरुन आज गोव्याला पोहोचणार आहेत. त्यानंतर उद्या हे सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहेत.


या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी अनेक आमदारांच्या कार्यालयांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे हे आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचं काय असा सवाल विचारण्यात येत होता. आता त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. या बंडखोर आमदारांना विमानतळापासून ते विधानसभेपर्यंत नेण्याची जबाबदारी ही या जवानांवर आहे. 


शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीसा बजावल्या असून कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य करुन  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये असा आदेश दिला आहे.