Nashik Grampanchayat Election : जानेवारी 2019 ते 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहेत. त्या तालुक्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 2055 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायती तर धुळे जिल्ह्यातील 52 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 


दरम्यान ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती बघून आयोगाने 2055 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम दिला होता. त्यानुसार कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत किंवा तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबवावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 


त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाचे पालन निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलान, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, देवळा आणि नांदगाव या तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत तर धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा या तालुक्यात एकूण 52 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. 


नाशिक, धुळे जिल्ह्यातील हे तालुके
नाशिक जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायती तर धुळे जिल्ह्यातील 52 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलान 13, निफाड 01, सिन्नर 02, येवला 04, चांदवड 01, देवळा 13, नांदगाव 06 तर धुळे जिल्ह्यात धुळे 02, साक्री 49, शिंदखेडा 01 अशी निवडणूक होत असलेल्या ग्रामपणाचायतींची संख्या आहे. 


हवामान खात्याची आयोगाची चर्चा 
न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हे विभाग पावसामुळे प्रभावित होणार नाहीत. अशा ठिकाणी निवडणुका घेता येणार आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आयोग आणि भारतीय हवामान खात्यातील तांत्रिक वरिष्ठ अधिकारी बरोबर चर्चा केल्यानंतर 62 असे तालुके निवडले आहेत, की ज्या ठिकाणी पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी आहे. 


असा असेल निवडणूक कार्यक्रम 
दरम्यान सादर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून 05 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत हि निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 05 जुलै रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे. 12 ते 19 जुलै नाम निर्देशनपत्र मागवणे, सादर करणे, 20 जुलै रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी, 22 जुलै रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेणे, 22 जुलै रोजी दुपारी तीन नंतर अंतीम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, 04 ऑगस्ट रोजी आवश्यक असल्यास मतदान, 05 ऑगस्ट रोजी मतमोजणी व निकाल घोषित करणे, 11 ऑगस्ट रोजी निकालाची अधिसूचना काढणे.