Sheetaltara Calligraphy :  मूळची मुंबईकर असलेली शीतल सध्या अमेरिकेतील बोस्टनस्थित सुलेखनकार असून स्व-अध्ययनातून गेली 10 वर्षे सुलेखन प्रयोग करीत आहे.


काय आहे अक्षरकलावारी?   
अक्षरकलावारी हा सुलेखन आणि रेखांकनाचा एक विशेष उपक्रम आहे. दरवर्षी पंढरीच्या वारी सोबत दर दिवशी एक या प्रमाणे शीतल ही  20 संतांचे 20 वेगळे अभंग आणि त्यासोबत विठ्ठलाचे नवे रूप रेखांकित करत असते. आळंदी आणि देहूवरुन निघालेल्या पालखी आषाढी एकादशीला पंढरीत पोचतात. त्या दिवशी या उपक्रमाची देखील सांगता होते. 


अक्षरकलावारीचा उद्देश?
हा उपक्रम सुरु करताना अनेक विचार शीतलच्या मनात होते. देवनागरी लिपी ही हजारहून अधिक वर्षांपूर्वी निर्माण झाली. जगातील 120 भाषा देवनागरीतून व्यक्त होत असतात. असे असले तरीही भारत आणि उपखंडांपुरता देवनागरीचा वापर आणि ओळख मर्यादित आहे. तीच गोष्ट पंढरीच्या वारीची. 800 वर्ष जुनी असलेली वारीची परंपरा फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागात माहिती आहे. जगभर सोडाच भारतातही याविषयी माहिती पोहोचलेली नाही. भारतीय संस्कृतीची ही समृद्ध परंपरा जगभर माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम तिने हाती घेतला आहे. विठ्ठलाचे रूप नितांत सुंदर आहे. युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (Renaissance) च्या तोलामोलाची वारकरी संप्रदाय ही गोष्ट आहे. तत्कालीन धर्मिक चौकटीच्या बाहेर जाऊन अध्यात्म समजावून देणारी हि परंपरा कलेच्या मुख्य प्रवाहातून बाजूलाच राहिल्याचे नेहमी दिसून येते. हे देखील एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे शीतलने विठ्ठल+अभंग+देवनागरी या तिन्ही गोष्टी तिच्या कलेच्या माध्यमातून एकत्र आणल्या. तिच्यामते गणपती, शिव, कृष्ण हे देव जेवढे कलेच्या माध्यमातून रेखाटले जातात तेवढा विठ्ठल रेखाटला जात नाही. आणि म्हणूनच विठ्ठल हि एक स्वतंत्र शैली तयार व्हावी म्हणून ती प्रयत्नशील आहे. 




अभंगांचे सुलेखन का करायचे? 
महाराष्ट्रच्या संत परंपरेकडे जास्त लक्ष वेधले जाणे गरजेचे आहे. आत्ता अस्तित्वात असलेली माहिती आणि प्रसिद्धी फारच तोकडी आहे, असे तिला वाटत असते. विरोधाभास हा कि सुंदर अर्थपूर्ण असा एवढा मोठा खजिना असताना कलाक्षेत्राने याकडे सुद्धा फार कमी लक्ष दिलेले आहे.  शीतल म्हणते अमेरिकेतील चेरी ब्लॉसम महोत्सव, स्पेनचा टोमॅटीनो उत्सव, फ्रान्स मधील टूर डे फ्रान्स हे जर जगातील लोकप्रिय आणि आकर्षक महोत्सव असतील तर तेच महत्व पंढरीच्या वारीलाही मिळायला हवे. विठ्ठलाचे रूप फार गोजिरे आहे, कपाळीचा टिळा, कानातील मत्स्यकुंडले, कटीवर असलेले हात हे रूप रेखांकनाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे. आणि अभंगाचे म्हणाल तर तिचा प्रयत्न अभंगातील विविधता समोर आणण्याचा आहे.




विठ्ठलावर, अनेकानी असंख्य लिखाण केले आहे. साधारणपणे 50 संतांनी हजारो अभंग लिहिले आहेत. मात्र 5-6 संतांचे मोजकेच अभंग सर्वश्रुत आहेत, प्रसिद्ध आहेत. सध्याच्या काळात समाजामध्ये अनेक विषयांवर फूट पडलेली दिसते, या पार्श्वभूमीवर शेख महम्मदांनी सोळाव्या शतकात विठ्ठलासाठी लिहिलेले अभंग दखलपात्र ठरतात. भारतीय संस्कृतीची विविधतेने नटलेली घट्ट वीण ज्यांना महत्वाची वाटते त्यांनी याकडे लक्ष द्यायलाच हवे. आपल्या संस्कृतीचा एक वेगळाच पैलू अभंगांतून पुढे आलेला दिसतो. गायले गेलेले अभंगच मुख्यतः लोकप्रिय झाले, पण त्यातून प्रस्थापित जातीपातीमध्ये बांधल्या गेलेल्या आणि कर्मकांड आधारित अध्यात्म साधनेला मोठा छेद दिला गेला होता हे विसरून कसं चालेल ? अभंगांतून उपस्थित होणारे प्रश्न अस्वस्थ करतात आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात हे फार महत्वाचे आहे. 




वारकरी मुख्यत्वे ग्रामीण असतात हे जरी खरं असलं तरी आता शहरी आणि निमशहरी भागातून अनेक लोक वारीत सहभागी होताना दिसून येतात. भेदाभेद अमंगल ठरवून मोकळ्या मनाने सर्वांना सामावून घेणारी अशी ही वारी असते. 




यावर्षी काय विशेष ?
शीतलच्या या उपक्रमातील कलाकृती दरववर्षी समाजमाध्यमांमध्ये फार लोकप्रिय होत असतात. यावर्षी तिने अनेक नवीन सुलेखनकारांना या उपक्रमामध्ये आमंत्रित केलेले आहे भारत, जर्मनी आणि अमेरिकेतील देवनागरी सुलेखनकारांच्या कलाकृती या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच सोबत आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच वारीच्या  शेवटच्या दिवशी या सर्व कलाकृतींचे व्हर्चुअल प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरवर्षी वेगवेगळ्या देशांतून नवीन सुलेखनकार प्रत्येक वर्षी यापुढेही जोडले जातील असा विश्वास वाटतो. ट्विटर आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून ९ लाख लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे 


हेही वाचा: