Maharashtra Political Crisis Sachin Kharat: शिवसेनेतील आमदारांचे बंड हे मागासवर्ग आणि वंचित घटकांच्याविरोधात असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे सचिन खरात यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने मागासवर्ग , वंचित घटकासाठी मोठे निर्णय घेतले आहे. कोरोना काळातही राज्याची आर्थिक संकटात असतानाही महाविकास आघाडी निधी उपलब्ध करून दिला. हा मोठा निधी वंचित घटकांना मिळत असल्याने  बंडखोरांच्या पोटात दुखत असल्याचा आरोप सचिन खरात यांनी केला आहे. 


सचिन खरात यांनी म्हटले की,  राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम कोरोना असतानाही तसेच राज्य सरकार आर्थिक संकटात असतानाही जोरात सुरू ठेवले. त्याशिवाय, राज्य सरकारने 28 एप्रिल रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोदयोग आणि चर्मकार विकास महामंडळचे भागभांडवल 1000 कोटी आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि अपंग महामंडळाचे भागभांडवल 500 कोटी केले आहे. 


महाविकास आघाडीच्या सरकारने मागासवर्ग, वंचित घटकांच्या प्रगतीसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय घेतल्याने बंडखोर आमदारांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यामुळेच हे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा डाव आखला जात आहे,  असा आमचा आरोप असल्याचे खरात यांनी म्हटले आहे.


दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राची माती ही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. याबाबत बोलताना फक्त मनसेच नाही, तर एमआयएममध्येही ते जाऊ शकतात, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 


उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. हा मोठा धक्का आहे का? याबाबत राऊतांना विचारलं असता ते म्हणाले की, "हा धक्का नाही. उदय सामंत सर्वांचे जवळचे होते. दीपक केसरकर आमचे जवळचे आहेत. तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती आमच्या जवळचा आहे. एकनाथ शिंदे आमच्या सर्वात जवळचे आहेत असेही त्यांनी म्हटले.