Maharashtra Rain : मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडं लातूर जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागातही पावसानं चांगली हजेरी लावली. तसेच बीड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. 


राज्यातील काही भागात जरी पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. अद्यापही काही ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला, त्या ठिकाणचे शेतकरी पेरणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, रात्री मुंबई शहरासह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच लातूर, बीड, मुंबई, सोलापूरच्या काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली.


लातूर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस


लातूर जिल्ह्यात सर्वत्र पावसानं चांगली हजेरी लावली आहे.  पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. मात्र, दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. लातूर शहर लातूर ग्रामीण औसा किल्लारी चा काही भाग रेनापुर अहमदपूर जळकोट आणि उदगीर मधील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पावसाने हजेरी लावल्या कारणामुळं वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत तयार करुन ठेवलं आहे. पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळं पेरणी करण्यात आली नव्हती. आजच्या पावसानंतर पेरणीला चांगलाच वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील एका तासापेक्षा जास्त कालावधीपासून पावसाची संततधार सुरु आहे. 


दरम्यान, जूनमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्यानं, तसेच किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्यामुळं पावसाचा जोर कमी आहे. जुलैमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता असल्यानं पाऊस मोठा खंड घेऊन पडेल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदा पावसाची सुरुवात खूप संथगतीने झाली. काही काळ दडी मारलेल्या पावसाचा जोर काहीसा वाढला असला, तरी ही परिस्थिती काही काळच राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील तीन ते चार जिल्हे सोडले तर, उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे.