Anil Parab : एका बाजूला शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्याने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ईडीने अनिल परब यांना आज, गुरुवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे.


मागील दोन दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवारी तब्बल 11 तास आणि बुधवारी जवळपास आठ तास ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. आज अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे.


आज, गुरुवारी पुन्हा एकदा अनिल परब चौकशीसाठी हजर राहणार आहेत.  सकाळी 11 वाजता परब यांना चौकशीसाठी बोलवण्यात आहे. ईडीने अनिल परब यांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितले आहे.  दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. 


अनिल परब यांना ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. 


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा  आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले होते.  काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.