Sanjay Shirsat On Ajit Pawar : "विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा शिवसेनेत आलेत तर त्यांचं स्वागत आहे. मात्र राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू," असा इशारा शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही शिंदे-फडणवीस सरकारसोबत आल्याचा दावा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. त्यामुळे आता शिरसाट यांच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडणार का? असाही प्रश्न विचारला जात आहे.
यापूर्वी देखील अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेऊन, संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची म्हणजेच शिवसेनेची भूमिका मांडली होती. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले होते की, "विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा शिवसेनेत आल्यास त्यांचे स्वागत आहे. मात्र राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू," असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला होता. मात्र आता प्रत्यक्षात अजित पवार 40 आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची आता काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, ते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. मात्र या निर्णयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. राजभवनात अजित पवारांसह त्यांच्या आमदारांनी जेव्हा शपथ घेतली, तेव्हा शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळत होती. तर राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिंदे गटाचा सरकारमध्ये महत्व कमी होण्याचू शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील आमदारांची देखील अजित पवारांच्या निर्णयाने निराशा झाला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून या सर्व चर्चांवर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिंदे गटाच्या नेत्यांचे मौन...
अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडले तर आणखी महत्वाच्या नेत्यांनी सध्या यावर बोलण्यास टाळले असल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: