Maharashtra Political Crisis : सध्या महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. 35 पेक्षा जास्त आमदारांसह शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहेत. संध्याकाळी पाच वाजता ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिवसेनाही बंडखोरीवर आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) कारवाई सुरू करण्यात आली आहे. बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. आमदारांप्रमाणे शिवसेनेने खासदारांचीही बैठक बोलवली होती. या बैठकीला चार खासदार अनुपस्थित होते.
वर्षा निवास्थानावर बुधवारी दुपारी शिवसेना खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चार खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामध्ये भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित आणि श्रीकांत शिंदे अनुपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर श्रीकांत शिंदे बैठकीला अनुपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण यामध्ये आता आणखी तीन खासदारांची भर पडली आहे. भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित शिवसेनेवर नाराज आहेत की अन्य कोणत्या कारणामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, हे अद्याप समोर आलेले नाहीत. राज्यात शिवसेनेचे 18 खासदार आहेत. त्यापैकी बैठकीला 14 खासदारांची उपस्थिती होती.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या