Shiv Sena MLA Latest Updates : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात आता  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे खाजगी विमानाने जळगाव विमानतळावरून गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत.  तर मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा मुंबईहून परस्पर गुवाहाटीकडे रवाना झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार हे एकनाथ शिंदेंच्या वाटेवर असून जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
 
यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. तर दुसरीकडे आता मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा त्याच वाटेवर गेले असल्याची सूत्रांची माहिती आहे.


जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सध्याची स्थिती बघितली तर तर शिवसेनेचे जिल्ह्यात एकूण चार आमदार आहेत. यात पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, धरणगावचे गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. यात गुलाबराव पाटील हे सद्यस्थितीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. तर मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे  अपक्ष आमदार आहेत. सध्या स्थितीत जिल्ह्यातील सर्व आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याने जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.  


जळगाव जिल्ह्यातील हे आमदार एकनाथ शिंदेंसोबत 
लता सोनवणे
लता सोनवणे या चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार आहेत. मागासवर्गीय महिला राखीव कोट्यातून त्या पहिल्या वेळेस आमदार झाल्या. त्या माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी निवडणुकीवेळी सादर केलेले जात प्रमाणपत्र वैध्य नसल्याचं सांगण्यात येत असून हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे.


चिमण आबा पाटील
जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील शिवसेनेचे आमदार आहेत. हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. स्थानिक नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत त्यांची फारसे न पटल्या मुळेच ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याचे सांगण्यात येतं. 1977 पासून त्यांनी सहा वेळा विधानसभा निवडणूक लढविली असून तीन वेळा ते आमदार झाले आहेत. गेल्या 45 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. राहुरी कृषी विद्यापीठात 5 वर्ष सिनेट सदस्य राहिले आहेत. जिल्हा बँकेवर पाच वर्ष अध्यक्ष राहिले आहेत. 


किशोर  पाटील
शिवसेनेचे पाचोरा येथील आमदार असून ते सलग दुसऱ्या वेळेस निवडून आले आहेत. माजी आमदार स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांचे ते पुतणे आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आहेत. पोलीस निरीक्षकांची नोकरी सोडून ते राजकारणात आले. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात पाचोरा विकास काम करण्यासाठी लागणारा निधी मिळवला. ते पाचोरा तालुक्याचे आमदार आहेत तर त्यांच्या पत्नी पाचोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत. किशोर पाटील यांनी पाच वर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष पदही भूषविलं आहे. याचसोबत गेली 15 वर्ष ते जिल्हा बँकेचे  संचालक आहेत.



महत्त्वाच्या इतर बातम्या