Maharashtra Politics CM Uddhav Thackeray Resign?: सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. इकडे राज्यात सत्ताबदलाची शक्यता व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राजीनामा देतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळपर्यंत राजीनामा देऊ शकतात, तसा प्रस्ताव ते स्वत: ठेवतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  


मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे आपल्या उरलेल्या आमदारांसह खासदारांशी चर्चा करतील. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्याआधी ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी एकटे भेटून चर्चा करतील. सोबतच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील ते चर्चा करतील, अशी माहिती आहे. 


उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चेनंतरच होईल असं बोललं जात आहे. मुख्यमंत्री सरकार बरखास्त करण्याची शिफारस करतील. मुख्यमंत्री ठाकरे स्वत: राज्यपालांना याबाबत पत्र लिहितील, अशी देखील माहिती आहे.  


संजय राऊतांच्या ट्वीटचा अर्थ काय?
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.." संजय राऊतांच्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.  


अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारलं आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार हे स्पष्ट झालं आहे.


काय आहे कायदेशीर प्रक्रिया


एबीपी माझाशी बोलताना कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे यांनी गटनेता बदलला आहे ते कायदेशीर आहे. मात्र जर शिंदेंकडे 37 सदस्य असतील तर गटनेता कोण आहे याला फार महत्व उरत नाही. कारण ते अपात्र ठरणार नाही. प्रत्येकाचं पत्र वेगवेगळं सह्यांसकट राज्यपालांना द्यावं लागेल. हे पत्र त्यांनीच लिहिलं आहे का याची शहानिशा होते. किंवा राज्यपालांसमोर सर्व 37 लोकांना उभं केलं तरी प्रश्न सुटू शकतो, असंही उल्हास बापट यांनी सांगितलं. हॉस्पिटलमधूनही राज्यपालांना राज्यकारभार चालवू शकतात, असंही ते म्हणाले.  बापट यांनी सांगितलं की, विधानसभा बरखास्त करणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. जर विद्यमान सरकारने बहुमत गमावले तर राज्यपालांना आधी जे सरकार बनवण्यास इच्छुक आहेत अशांना नियमानुसार संधी द्यावी लागते. इथे फडणवीसांना संधी दिली जाईल हे स्पष्ट आहे. जर फडणवीसांनी सरकार बनवण्यास नकार दिला तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्यानंतर विधानसभा बरखास्त होईल आणि त्यानंतर सहा महिन्यांत निवडणूका घ्याव्या लागतील. बहुमत गमावले असेल तर मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा द्यावा लागेल.  मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यपाल काय करु शकतात हा मोठा प्रश्न आहे.  कारण असे आतापर्यंत कधी झालेले नाही. पण डी डी बसू या कायदेतज्ज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बरखास्त करु शकतात, असं बापट यांनी सांगितलं.


इतर महत्वाच्या बातम्या


शिंदेंसोबत शिवसेनेचे नेमके आमदार किती? शिंदे म्हणतात 40 तर कुणी म्हणतंय 33, कुणी म्हणतंय 35... 


महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय; सामनातून हल्लाबोल 


महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील?