Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना अडचणीत आल आहे. राज्यातील राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आता नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेची ही अवस्था पाहून संजय राऊत खूश असतील असं राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी अशा आशयाचं ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह भाजपच्या गोटात जाण्याची चर्चांना उधाण आलं आहे. त्यात आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


नारायण राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल. राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'संजय राऊत खुश! कारण त्यांना शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा आणि शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी आणि दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.'






शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात मोठा भूकंप आला आहे. बंडखोर एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहेत. असे झाल्यास ठाकरे सरकार अल्प मतात येईल. त्यामुळे सध्या शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.


संजय राऊत यांनी ट्विट करून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत का ? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्यामुळे आता राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? विधानसभा बरखास्त झाल्यामुळे राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता पुढील काही दिवसांमध्ये काय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे.