CM Uddhav Thackeray Covid-19 Positive : राज्यात राजकीय संघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली आहे. तसेच, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. पण मुख्यमंत्र्यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याच्या वृत्ताला मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
एबीपी माझाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक क्विक अँटिजन टेस्ट करण्यात आली. याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, पण आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे संभ्रम आहे. त्यामुळे काही काळानं पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतरच मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत की, नाही याबाबत चित्र स्पष्ट होईल. सध्या मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला ऑनलाईन उपस्थित आहेत. बऱ्याचदा अँटिजन टेस्टचा रिपोर्ट चुकू शकतो, त्यामुळं आरटीपीसीआर केली जाते. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या कोरोना अहवालाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत माहिती दिली जाईल.
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करत महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं असं म्हटलं होतं. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी बोलताना सांगितलं की, "काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी विधानसभा बरखास्त करण्याचा आमचा कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, पुढे आम्ही पूर्ण ताकदीनं सरकार चालवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं."
कमलनाथ यांनी सांगितलं की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असल्यानं मी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. मी बराच वेळ त्यांच्याशी फोनवर बोललो, त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं की, शिवसेनेचे उर्वरित आमदार त्यांच्यासोबत आहेत, काही लोकांची दिशाभूल झाली आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्यासोबत येतील. आपलं सरकार कोसळणार नाही." त्यावर आम्हीही शिवसेनेसोबत आहोत, असं कमलनाथ यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांची अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.." संजय राऊतांच्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काहीव आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.