maharashtra political crisis : "आम्ही इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. आमची शिवसेना मूळ शिवसेना आहे. त्यामुळे उर्वरीत 14 जणांनी देखील आमच्याकडे यावे, उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत, असे मत शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. याबाबत दीपक केसरकर यांच्यासोबत एबीपी माझाने संवाद सांधला. केसरकर म्हणाले, "विधानसभेच्या उपाध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही कोर्टात गेलो आहे. आम्ही मूळ शिवसेना आहोत. आम्ही शिवसेनेतच राहणार आहे. विधीमंडळातील मूळ गटाचे नेते एकनात शिंदेच आहेत. आम्हाला पाठवलेल्या नोटीसा बेकायदेशीर आहेत. आमच्या 16 आमदारांना आतापर्यंत नोटीसा आल्या आहेत. याच अपात्रतेच्या विरोधात शिंदे गट कोर्टात गेला आहे."
कोणत्याही पक्षाला संजय राऊतांसारखा प्रवक्ता मिळू नये
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंडखोरी केलेल्या आमदरांवर जोरदार टीका केली आहे. बंडखोरी करणाऱ्या आमदरांचे शंभर बाप आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. याबाबत देखील दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी आमच्या मातांचा अपमान केलाय. कोणत्याही पक्षाला संजय राऊत यांच्यासारखा प्रवक्ता मिळून नये. पक्षासाठी रक्त सांडलेल्या लोकांची संजय राऊत नाचक्की करतात. राऊतांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. संजय राऊत यांच्यासारखे प्रवक्ते मिळाले तर शिवसेना कधीच वाढणार नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी संजय राऊत यांना शिवसेनेतून बाहेर काढलं असतं. संजय राऊतांचे आरोप आम्ही दकापी सहन करणार नाही. आमच्यामुळेच संजय राऊत राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी थोडा विचार करून भाषा वापरावी. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे अनेक मित्र तुटले आहेत."
गरीबांसाठी काम करणारी शिवसेना म्हणून मी शिवसेनेत आलो. मला मंत्रीपद दिलं म्हणजे उपकार केला नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत." असे दीपक केसरकर यांनी यावेळी म्हटले आहे.