Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या आरोपावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार हे काँग्रेसच्या आमदारांना त्रास द्यायचे, निधी देत नसत असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली.
नाना पटोलेंना अजित पवारांचं उत्तर-
आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. आमचे सर्व आमदार सोबत आहेत. काही आमचे मित्रपक्ष म्हणतात अजित पवारांनी निधी दिला नाही वगैरे.. सरकार गेल्या अडीच वर्षात काम करतंय..तिन्ही पक्षाचे पालकमंत्री आहेत, कोणाबाबतही दुजाभाव केला जात नाही.. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं होतं. पवार साहेबांनी पुढाकार घेतला, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असे सर्व एकत्र येऊन हे सरकार अस्तित्वात आलं.
नाना पटोले काय म्हणाले होते ?
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, "अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यानंतर मी शरद पवार आणि अजित पवारांना भेटलो आणि त्यासंबंधीचा भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी म्हटलं." काँग्रेस पूर्ण ताकतीने शिवसेनेच्या मागे उभी राहिल असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, "आम्हाला सत्तेचा कोणताही मोह नाही, त्यामुळे जनेतेसाठी आम्ही लढत राहू. महाविकास आघाडीसोबत काँग्रेस राहिल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही तर ईडीच्या भीतींमुळे बंडखोर आमदांरांनी हे पाऊल उचललं असून त्यामागे भाजप आहे. हे सरकार पाच वर्षे चालेल. भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जातं हे देशातील जनतेला पाहू द्या."
उद्धव ठाकरेंना आमचा पाठींबा - अजित पवार
बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन तर काही प्रत्यक्ष हजर होते. महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार, मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो. आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तवर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.. सेनेचे काही आमदार परत आले आहेत.. त्यांनी आपली आपबिती सांगितली आहे, असेही अजित पवार म्हणाले.
शिवसेनेचा वेगळी भूमिका असू शकते - अजित पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार, आमदारांची बैठक घेतली. राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय झालाय. तसेच काम सुरुच ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलाय. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. याशिवाय दुसरी कोणतीच भूमिका आमची नाही, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहणार आहोत. शिवसेनेचा वेगळी भूमिका असू शकते. काही आमदार परतत आहेत, तेथील आमदारांना मुख्यमंत्री यांनी आवाहन केलंय.
राऊतांच्या वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार?
संजय राऊत यांच्या ' ..तर महाविकास आघाडीतून बाहेर' पडण्याच्या विधानावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कदाचित आमदारांना परत बोलावण्यासाठी सुद्धा तसं विधान केलेलं असावं. संजय राऊत जे बोलले तेच ठाकरे यांच्या मनात आहे का हे विचारू.