Maharashtra Political Crisis : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उद्या होणाऱ्या बहुमताच्या चाचणीत मतदान करण्यासाठी परवानगी मागितली आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भातील याचिका दाखल करण्यात आली आहे. अशीच याचिका राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकी वेळीही मलिक आणि देशमुखांकडून दाखल करण्यात आली होती. पण त्यावेळी सुप्रीम कोर्टाकडून दोघांनाही मतदानाची परवानगी नाकारली होती. 


यापूर्वी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2022) आणि विधान परिषद (Vidhan Parishad Election 2022) निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करण्याची परवानगी मागणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयासोबतच सुप्रीम कोर्टानंही नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क नाकारला होता. 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच ठाकरे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


उद्या जर बहुमत चाचणी झाली, तर ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल. शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवाब मलिक आणि अनिल देशमुख ईडी कोठडीत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी ठाकरे सरकारसमोर आव्हानांचा डोंगर आहे. 


दरम्यान, सध्या राज्यात सत्तासंघर्ष रंगला आहे. राज्यातील सत्तापेच आणखी गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारपुढे सरकार टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. अशातच महाविकास आघाडीतील तीन पक्ष म्हणजेच, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडून सरकार टिकवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक पर्यायाची चाचपणी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केली जात आहे.