Ramdas Kadam : आज सकाळी, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडी पथकाने छापा मारला. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीय. विरोधी पक्षातून आरोप-प्रत्योरोप होताना दिसत आहेत. अशातच रामदास कदमांनी संजय राऊतांवर आरोप करत प्रतिक्रिया दिलीय.
राष्ट्रवादीला सर्वात जास्त निधी मिळत होता - रामदास कदम
रामदास कदम म्हणाले, संजय राऊतांनी शिवसेनेपेक्षा शरद पवारांसाठी जास्त काम केलं, राष्ट्रवादीला सर्वात जास्त निधी मिळत होता. उद्धव ठाकरे आजारी असताना अजित पवारांना रान मोकळं मिळालं. आजारी असल्याने ठाकरेंना दोष देऊन चालणार नाही. कर नाही तर डर कशाला? निधीवाटपात अन्याय होत असताना संजय राऊत गप्प का होते? शिवसेना फुटत असताना संजय राऊत गप्प का होते? त्यामुळे राऊतांची भूमिका महाराष्ट्राला कशी पटेल? आता तरी राऊत बोलवणं थांबवणार का?असे प्रश्न कदमांनी विचारले आहे.
शिंदे गटातून प्रतिक्रिया
ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांवर भाजपकडून सातत्याने आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर आले आहे. आज, रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या इतर नेतेदेखील ईडीच्या रडारवर आहेत. त्यातील काही आमदार, खासदार हे मागील महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात सामिल झाले आहेत.
कोणते नेते ईडीच्या रडारवर?
> प्रताप सरनाईक : टॉप सिक्युरिटीच्या कथित घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक हे ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने त्यांची व त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली होती. त्याच्या मालमत्तेवरही ईडीने टाच आणली होती. प्रताप सरनाईक हे सध्या शिंदे गटात सामिल झाले आहेत.
> भावना गवळी : खासदार भावना गवळी यांच्यावर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. ईडीने भावना गवळी यांच्या ट्रस्टमधील जवळच्या सहकाऱ्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात जामीन मंजूर केला होता. भावना गवळी या सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाल्या आहेत.
> अनिल परब : अनिल देशमुख चौकशी प्रकरणी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहीलेल्या पत्रात अनिल परबांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्याशिवाय दापोली येथील रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. अनिल परब परिवहन मंत्री असताना त्यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानी ईडीने छापा मारला होता. जवळपास 10 ते 12 तास चौकशीही केली होती. अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात.
> अर्जुन खोतकर : अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ED कडून चौकशी सुरू आहे. दहा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. काही कारणास्तव, अडचणींमुळे आपण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
> आनंदराव अडसुळ : सिटी बॅंकेच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर आहे. सिटी बॅंकेत कामगार, पेंशनधारक अशा 99 टक्के मराठी माणसांची खाती होती. या बॅंकेतील पैसे बिल्डरांना अवैधरित्या वाटल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी अडसूळांनी कमिशन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
> संजय राऊत : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्याशिवाय, संजय राऊत यांची पीएमसी प्रकरणासह पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे.
> यशवंत जाधव आणि यामिनी जाधव: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव हेदेखील केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही महिन्यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्या निवासस्थानी छापामारी केली होती. जवळपास तीन दिवस त्यांच्या घराची झडती, कागदपत्रांची तपासणी सुरू होती. बनावट कंपनीच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. ईडीकडून ही त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव हे शिंदे गटात सामिल झाले आहेत.