Jalna: दिलजमाई होऊन चार दिवस उलटत नाही तो पुन्हा दानवे-खोतकर वाद आला समोर

jalna News: दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद मिटवणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक आव्हान असणार आहे. 

Continues below advertisement

Jalna News: शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी शनिवारी शिंदे गटात सहभागी होण्याची घोषणा केली. त्यापूर्वी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रावसाहेब दानवे आणि खोतकर यांची दिलजमाई सुद्धा केली. मात्र ही दिलजमाई होऊन चार दिवस उलटत नाही तो आता लोकसभा जागेवरून पुन्हा एकदा दानवे-खोतकर वाद पाहायला मिळाला आहे. जालना लोकसभा जागेवर आपला हक्क सोडला नसल्याचा दावा खोतकर यांनी केला आहे, तर आपण लोकसभा जागा कुणासाठीही सोडणार नसल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. 

Continues below advertisement

गेली चार-पाच दिवस अर्जुन खोतकर दिल्लीत ठाण मांडून बसले होते. यादरम्यान खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. तसेच दानवे आणि खोतकर यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घडवून त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करत दोघांची दिलजमाई केली. मात्र यावेळी आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघ सोडावा अशी मागणी खोतकर यांनी केली होती. 

शनिवारी शिंदे गटात सहभागी होतांना सुद्धा खोतकर यांनी लोकसभा जागा आपल्यला सोडण्याची मागणी कायम असून, आपण माघार घेतली नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यांच्या याच दाव्यावर बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या जमिनीत मेहनत करून, तब्बल 25 वर्षे कष्ट करून तिला सुपीक केलं, आता ती जमीन मी इतरांना कसायला कशी देणार? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. त्यामुळे दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद अजूनही मिटलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

मुख्यमंत्र्यांसमोर वाद मिटवण्याचे आव्हान? 

खोतकर आणि दानवे हे वाद काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद चर्चेत राहिला आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली होती. मात्र निवडणुकीनंतर सुद्धा या दोन्ही नेत्यांमधील वाद काही मिटू शकला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा वाद मिटवणे एक आव्हान असणार आहे. 

खोतकर मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज ते आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात विविध विकासकामांचे उद्घाटन करत, जाहीर सभेला हजेरी लावणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर हे सुद्धा सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. कालच खोतकर यांनी शिंदे गटात सहभागी होण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या जच्या दौऱ्यात त्यांचाही सहभाग असणार असल्याचे बोलले जात आहे. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola