ज्या शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व मानसन्मान मिळाले त्याच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेमधील फुट ही नवीन नसली, तरी यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे मोठं आणि अभूतपू्र्व आहे. या बंडाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान मिळाले आहे. 


त्यामुळे काय होणार याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहतील की नाही? या सरकारचे भवितव्य काय असेल? तसेच भाजपला पाठिंबा दिल्यास शिंदे गटाला काय मिळणार? याचीही सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. मात्र, हॉटेल समोर आज एक वेगळी परिस्थिती दिसून आली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोर मोठे आंदोलन करत आमदारांना परत पाठवून द्या अशा घोषणा केल्या. 


एकंदरीत झालेले आंदोलन तसेच भाजपने सरकार स्थापन करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यास या प्रक्रियेमध्ये कदाचित विलंब होऊ शकतो. त्यामुळे दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांना तसेच भाजपसमोरे मोठे आव्हान आहे. म्हणून त्यांना मणिपूरमध्ये नेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार सर्व आमदारांना मणिपूरमध्ये हलवलं जाणार असल्याचे बोलले जात आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये या सर्व आमदारांनी एकत्र ठेवले जाईल असं बोलले जात आहे. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी अप्रत्यक्षरित्या भाजपकडूनही घेतली जात आहे. शिंदे गटाकडून सातत्याने 50 वर आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजूनही त्यांच्या सोबत किती आमदार आहेत याबाबत साशंकता आहे. याचं कारण शिवसेनेकडूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत 20 आमदार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गट करून भाजपसोबत सरकार स्थापन निर्णय करायचा झाल्यास त्यांना 37 आमदारांचा पाठिंबा हा दाखवा लागेल. मात्र, या क्षणी जे पत्र सादर केलं आहे त्याच्यावरती 34 आमदार यांनी सह्या केल्याचे दिसून येते. त्यामुळे अजूनही त्यांना तीन आमदारांची गरज आहे. दरम्यान, आज सकाळीही काही आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. 


दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक साद घालत सर्व आमदारांना एक प्रकारे परत येण्यास सांगितले आहे. जर राजीनामाच हवा असेल तर समोर सांगा मी राजीनामा तयार ठेवला आहे असे त्यांनी काल जनतेशी संवाद साधताना सांगितले. काल रात्री त्यांनी वर्षाचे शासकीय निवासस्थानातून मातोश्रीमध्ये पोहोचले आहेत. आज मातोश्रीवर ती काही शिवसेना नेत्यांची बैठक होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची बैठक गुवाहाटीमध्ये होईल असे बोलले जात आहे.