मुंबई: बंडखोर आमदार उद्या महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे पत्र प्रत्यक्षात देण्याऐवजी ई-मेलच्या माध्यमातून देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाला अधिक धार येणार आहे. 


बंडखोर आमदारांनी त्यांच्या सह्या असलेले पत्र जर राज्यपालांना दिलं तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. असं जर झालं तर राज्यपाल हे पुढील 24 तासात किंवा 48 तासांमध्ये राज्य सरकारला त्यांची बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगू शकतात. त्यानंतर मग विधानसभेमध्ये फ्लोअर टेस्ट होईल. 


या संबंधी एकनाथ शिंदे गटाकडून सल्लामसलत करण्यात येत असल्याची माहिती आहे. हे पत्र तयार असून उद्या सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास हे पत्र राज्यपालांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण हे पत्र प्रत्यक्षात येऊन देण्यापेक्षा ई- मेलच्या माध्यमातून देण्यात येण्याची जास्त शक्यता आहे.  


दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदे गटाकडून राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असून दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर देंवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे. तसेच दिल्लीवरून जाऊन आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांशी चर्चा केली आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी परत यावं असं आवाहन केलं आहे. तसेच बंडाच्या पार्श्वेभूमीवर मातोश्रीवर शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.