Devendra Fadnavis On Sharad pawar : राष्ट्रपती राजवट लावण्यामागे नेमकी कारणं काय? हे शरद पवारांनी सांगावं, असे आव्हान पहाटेच्या शपथविधीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात बोलताना पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट (President rule ) उठली असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना आव्हान दिलेय.
राष्ट्रपती राजवट का लागली? राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लागली? त्याच्या पाठीमागे कोण होतं? याचा खुलासा शरद पवार यांनी करावा, त्यानंतर सर्व कड्या जुळतील अन् तुमच्यासमोर उत्तरे येतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांचीच स्क्रीप्ट होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारण नव्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावर आज पुण्यात शरद पवार यांनीही आपलं मत मांडलं. पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट (President Rule ) उठली. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही पवार म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आता शरद पवार यांना आणखी एक आव्हान दिलेय. ते म्हणाले की, राष्ट्रपती राजवट का लागली? कुणाच्या सांगण्यावरुन लागली? त्याच्या पाठीमागे काय होतं? याचा खुलासा शरद पवार यांनी करावा.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ?
त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं होतं की अजित पवार यांनी आपल्यासोबत येऊन शपथ घेतली आहे, आणि शरद पवार यांना याची कल्पना आहे, ते आपल्या सोबत आहेत. अजित पवार मोठा चेहरा आहे, मात्र राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी अजित पवार यांचा वापर केला असेल असं मग त्यांच्या राजकीय जीवनातील ती चूक आहे किंवा अजित पवार यांच्या बद्दलचा तो भाव आहे. मात्र त्यासाठी दुसरे नेते होते, अजित पवार यांनाच का पाठवले त्यांची विश्वसनीयता कमी करायची होती, यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करायचे होते, राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते काम करतात, मात्र अजितदादा यांचे महत्व कमी करायची होतं का? असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली - संजय राऊत
महाविकास आघडीचे सरकार येऊ नये म्हणून कोंडी केली होती, पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली. राष्ट्रपती राजवट उठली लख्ख प्रकाश पडला, असे संजय राऊत म्हणाले. शरद पावर यांना समजायला 100 वर्ष लागतात असे मी म्हटलो होतो, तेव्हा टीका झाली आता समजले असेल. बहुमत आम्ही दाखविले असते तरी तत्कालीन राज्यपाल यांनी डोकी मोजयला 5 वर्ष लावले असते. पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना माहिती होते की नाही मला माहित नाही, कोंडी फुटायला शपथविधीने मदत झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो त्यांनी कोडी फुटायला मदत केली, असे संजय राऊत म्हणाले.
आणखी वाचा :
Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; शरद पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य