Devendra Fadnavis: राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार, ते राजीनामा देणार, पुढील निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या खटल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आली होती. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आता उद्या, गुरुवारी 11 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरल्यास त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र, एकनाथ शिेदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील असे वक्तव्य निकालाआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल हा एकनाथ शिेदे यांच्या बाजूने लागेल असे संकेत फडणवीस यांनी दिले का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सत्तासंघर्षाचा उद्या निकाल
सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला झालाय. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. हा निकाल उद्या येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान निकालासंदर्भात टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा.. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण आपल्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे