Arjun Khotkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल सहज योगायोगानं भेट झाली होती. त्यावेळी तिथे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी मला चहाचे आमंत्रण दिले होते, त्यामुळं मी रावसाहेब दानवे यांच्या घरी आलो असल्याचे मत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी व्यक्त केलं. मी जालन्यात गेल्यावर माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही खोतकर म्हणाले. दरम्यान, संकट असेल तर कोणाही सेफ होण्याचा प्रयत्न करेल असेही खोतकर यांनी सांगितलं.
अर्जुन खोतकर हे गेल्या दोन दिवसापासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काल त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे. तसेच रावसाहेब दानवे यांची देखील खोतकरांनी काल भेट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा दानवेंची खोतकरांनी भेट घेतली. तब्बल तासभर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सलग दुसऱ्या दिवशी या दोघांमध्ये चर्चा झाल्यानं खोतकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आपण जालन्यात जाऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो
माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो असेही अर्जुन खोतकर यांनी सांगितले. संकट असेल तर कोणाही व्यक्ती सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच असेही खोतकर म्हणाले. मी माझ्या निर्णयावर सविस्तर बोलणार आहे. उद्धव ठाकरे हे जर काही बोलत असतील तर त्यांचा तो अधिकार असल्याचे देखील खोतकर यावेळी म्हणाले. मी जालन्याला गेल्या माझी सविस्तरपणे भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितले. माझ्या चेहऱ्यावर तणाव का आहे याची कारणं सर्वांनी माहित असल्याचे देखील खोतकर म्हणालेत.
शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहे. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. तर अजूनही आपण शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका असे खोतकर म्हणाले होते. दरम्यान जालन्यात जाऊन खोतकर आपली भूमिका जाहीर करणार आहेत.