Poladpur Accident : रायगड (Raigad) जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्विटद्वारे दिली आहे.


 






परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघातात दुदैवी अंत


रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याजवळ कशेडी घाटामध्ये काल रिक्षा व डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातात एकूण 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. पोलादपूर खेड येथून माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे परतत असताना रिक्षेचा अपघात झाला. खेड येथे परीक्षेसाठी जात असलेल्या गोरेगाव येथील विद्यार्थ्यांचा या अपघातात दुदैवी अंत झाला आहे. या अपघातात तीन मुली आणि एक रिक्षाचालक ठार झाला आहे. वाळूने भरलेला डंपर या रिक्षावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे कळत आहे, हालीमा अब्दुल सलाम पोपेरे, (23 वर्षे, नांदवी),  आसिया सिद्दीक  (20 वर्षे, गोरेगाव), नाजमीन मूफीद करबेलकर (22 वर्षे, सवाद) अमन उमर बहुर (46 वर्षे, गोरेगाव) यांचा मृत्यू झाला आहे. 


उदय सामंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.. 
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून, या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख मदत जाहीर केली आहे.


अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प 
अपघाताबाबत माहिती अशी की, काल संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात वाळूने भरलेला डंपर काल पलटी झाला. वाळूच्या ढिगाऱ्याखाली एक रिक्षा अडकली. रिक्षातील प्रवासी आणि चालक देखील वाळूच्या ढिगाऱ्याखाली अडकले. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील एका व्यक्तीचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आला असून वाळूचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू होते. या रिक्षामध्ये चालक आणि तीन प्रवासी मुली होत्या. रिक्षावर डंपरमधली संपूर्ण वाळू पडल्याचे रिक्षातील चारही जाणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परंतु, पोलिसांनी आणि स्थानिकांनी वाळू बाजूला करून काही वेळानंतर ही वाहतूक सुरळीत केली.  


संबंधित बातम्या


मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भीषण अपघात, तीन मुलींसह एकाचा मृत्यू