Nashik Trambakeshwar Tripurari Purnima : त्र्यंबकेश्वर (Trimakeshwer) येथे रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. पंचवीस हजाराच्या वर भाविक रथोत्सवाला उपस्थित होते. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास श्री त्र्यंबकेश्वरचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा रथात ठेवण्यात आला. त्यानंतर 'त्र्यंबकराज की जय' घोषात पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्र्यंबकेश्वराच्या रथाचे सार्थ करण्याच्या जागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवण्यात आलेली होती. जणू काही साक्षात भगवान त्र्यंबकेश्वरचा सृष्टी करता ब्रह्मदेव रथ ओढत आहे, अशी आध्यात्मिक अनुभूती यावेळी भाविकांना आल्याचे स्थानिकांनी सांगितले.  


दिवाळीनंतर (Diwali) येणारा हा सर्वात मोठा उत्सव नाशिक जिल्ह्यातील (Nashik) त्र्यंबकेश्वरमध्ये दिवाळीप्रमाणे साजरा होत असतो. त्रिपुरारी पौणिमेच्या दिवशी शहरात रथोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी मोठ्या उत्साहात या रथोत्सवाची तयारी करण्यात आली. यंदा रथोत्सवाला तीन बैल जोड्यांची साथ दिली. तर पालखी त्र्यंबकेश्वराचा चांदीचा मुखवटा होता. सवाद्य मिरवणुकीत भाविक भोलेचा जयजयकार करीत होते. सजवलेला रथ तीर्थराज कुशावर्तावर ल्यानंतर मूर्तीला अभिषेक स्नान घालण्यात आले. यावेळी आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष शंकरानंद सरस्वती यांनी रथाचे चौकात स्वागत केले. 


दरम्यान रथोत्सव मार्गावर त्र्यंबकेश्वर वासियांकडून लक्षवेधी रांगोळ्यासह सजावट करण्यात आली होती. महिलावर्गाने मंदिरात दिवे लावण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सातच्या सुमारास कुंडावरून मंदिराकडे रथ परतण्यास प्रारंभ झाला. यावेळी मिरवणूक मार्गावर फटाक्यांची आतिश बाजी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विकास कुलकर्णी यांनी मंदिरात हजेरी लावत पूर्व दरवाजा परिसरात भेट देत रांगेच्या नियोजनाची पाहणी केली. रांग नियोजनाचा आढावा घेतला. ट्रस्टचे अधिकारी समीर वैद्य व सहकारी नियोजनासाठी कार्यरत होते. त्र्यंबकेश्वरच्या विकासाकडे आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने सरकारकच्या विकास कामांच्या आराखड्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. 


बारा हजारातील रथ 
देवदिवाळीनिमित्त होणाऱ्या रथोत्सवाची जंगी तयारी झाली आहे. 157 वर्षांपूर्वी अवघ्या बारा हजार रुपयात त्र्यंबकेश्वरचा रथ तयार केला असल्याची माहिती रथोत्सव समितीने दिली आहे. दरम्यान त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तब्बल 31 फूट उंचीच्या लाकडी रथाची सजावट करण्यात आली. पेशव्यांचे सरदार रघुनाथ विंचुरकर यांनी 3 नोव्हेंबर 1865 ला हा रथ देवस्थानास अर्पण केला. संपूर्ण शिसवी लाकडात बांधलेल्या या रथासाठी त्याकाळी 12 हजार रुपये खर्च आला होता. अनेक देव देवतांच्या मूर्तीसह अष्ट दिक पालांच्या मूर्ती या लाकडी रथावर कलात्मक कोरलेल्या आहेत. जयपूर येथील माणिकचंद रजपूत यांनी हा रथ तयार केला आहे. फार पूर्वी हा रथ दोऱ्या बांधून हाताने ओढला जायचा. आता बैलांच्या तीन जोड्या या रथासाठी सज्ज झाल्या आहेत.