(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News : 'नॅक मूल्यांकन’ न करणाऱ्या महाविद्यालयांना कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश; 7 सप्टेंबरपर्यंत मुदत
Maharashtra News : ‘नॅक मूल्यांकन’ एकदाही न करणाऱ्या महाविद्यालयांच्या यादीसह महाविद्यालयाची विद्यापीठाशी असलेली संलग्नता काढून टाकण्याबाबत कार्यवाहीचा तपशील सादर करायचा आहे.
Maharashtra News : नॅक मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन एकदाही न झालेल्या राज्यातील अशा महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा संक्षिप्त अहवाल आता राज्यातील सर्व विद्यापीठांना येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच दिनांक 7 सप्टेंबरपर्यंत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला सादर करायचा आहे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
‘नॅक मूल्यांकन’ एकदाही न करणाऱ्या महाविद्यालयांच्या यादीसह महाविद्यालयाची विद्यापीठाशी असलेली संलग्नता काढून टाकण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील मागविण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.
राज्यातील ज्या अशासकीय महाविद्यालयांनी आतापर्यंत एकदाही नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन केलेले नाही अशा महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात विद्यापीठाने काय कार्यवाही केली? या संदर्भातील अहवाल उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने मागवला आहे
राज्यातील महाविद्यालयांना यापूर्वीही आदेश देण्यात आला होता
याच संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 नुसार चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या सुरुवातीपासूनच ज्या महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन केलेले नाही, अशा महाविद्यालयांबाबत संलग्नता काढून घेण्याची कार्यवाही करावी आणि संबंधित अहवाल सादर करावा, असा आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने यापूर्वीही दिला होता. मात्र, राज्यातील विद्यापीठांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा सर्व विद्यापीठांना कार्यवाहीबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल येत्या दोन दिवसांत सादर करण्याच्या सूजना देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठांना दोन दिवसांची मुदत
संलग्नता काढून घेतलेल्या महाविद्यालयांची यादी शिक्षण विभागाने विद्यापीठांकडून मागविली आहे. या संदर्भात उच्च शिक्षण विभागाने 23 मे आणि 9 ऑगस्ट रोजी सर्व विद्यापीठांना नॅक मूल्याकंनाबाबत कळविले होते, पण तरीही विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे.
आता त्यानुसार महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात विद्यापीठांनी त्या महाविद्यालयांच्या नावाच्या यादीसह केलेली कार्यवाही नमूद करून कार्यवाहीचा अहवाल उच्च शिक्षण संचालनालयाला पाठवायचा आहे.
महत्वाच्या बातम्या :